जॉर्जियातल्या रिसॉर्टमध्ये 12 भारतीय मृतावस्थेत; मृत्यूचे कारण उघड

टिबिलीसी, (जॉर्जिया) – जॉर्जियातल्या गुदौरी भागातल्या डोंगराळ भागातल्या रिसॉर्टमध्ये १२ भारतीय मृतावस्थेत आढळले असल्याचे जॉर्जियातल्या भारतीय दूतावासाने म्हटले आहे. प्राथमिक तपासणीमध्ये मरण पावलेल्या या सर्व भारतीयांच्या अंगावर कोणत्याही जखमा किंवा हिसाचार झाल्याच्या खुणा आढळलेल्या नाहीत. या सर्वांचा मृत्यू कार्बन मोनोक्साइडच्या विषबाधेमुळे झाला आहे, असे स्थानिक माध्यमांंनी पोलिसांच्या हवाल्याने म्हटले आहे.
मरण पावलेले सर्व भारतीय नागरिक असल्याचे भारतीय दूतावासाने म्हटले आहे. तर मृतांपैकी ११ जण परदेशी नागरिक असून एक जॉर्जियाचाच नागरिक असल्याचे जॉर्जियाच्या गृह मंत्रालयाने म्हटले आहे. हे सर्व जण एकाच भारतीय रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कर्मचारी होते. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील बेडरुममध्ये हे सर्वजण मृतावस्थेत आढळले असल्याचे जॉर्जियाच्या गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
गुदौरी येथील रिसॉर्टमध्ये १२ भारतीयांच्या मृत्यूबद्दल नुकतीच माहीती मिळाली असून या सर्वांच्या कुटुंबीयांप्रती भारतीय दूतावासाने तीव्र सहवेदना व्यक्त केल्या आहेत. या प्रकरणाचा तपशील स्थानिक प्रशासनाकडून मिळवला जातो आहे. सर्व मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे भारतीय दूतावासाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
जनरेटरमुळे विषारी वायू पसरल्याचा संशय…
जॉर्जियातल्या पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला प्रारंभ केला असून प्राथमिक तापासानुसार या रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांच्या बेडरुमजवळ असलेला पॉवर जनरेटर शुक्रवारी रात्री वीज प्रवाह खंडीत झाल्यामुळे सुरू करण्यात आल्याचे आढळून आले आहे. या सर्वांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक पथकालाही नियुक्त करण्यात आले आहे. या रिसॉर्टमधील सर्वांची चौकशी देखील केली जाते आहे, असेही दूतावासाने म्हटले आहे.





