US-Iran Conflict: इराणमधील 9000 भारतीयांना घरातच राहण्याचा सल्ला; भारतीय दूतावासाकडून नवी अॅडव्हायझरी
US-Iran Conflict: इराणमध्ये सध्या सुमारे ९,००० भारतीय नागरिक असून त्यात विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या सर्वांना सध्याच्या बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

US-Iran Conflict: अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने इराणमधील आपल्या नागरिकांसाठी सतर्कता इशारा जारी केला आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या ताज्या लष्करी हल्ल्यांनंतर पर्शियन गल्फ क्षेत्रातील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली असून तेहरानस्थित भारतीय दूतावासाने मंगळवारी नवी अॅडव्हायझरी प्रसिद्ध केली आहे.
अनावश्यक बाहेर पडू नका –
दूतावासाने अॅडव्हायझरीत म्हटले आहे की, “विकसित होत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इराणमधील सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, अनावश्यक बाहेर पडणे टाळावे आणि शक्य तितके घरातच राहावे.” तसेच नागरिकांनी बातम्यांवर सतत लक्ष ठेवावे, सद्यस्थितीबाबत सजग राहावे आणि दूतावासाकडून येणाऱ्या पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी, असेही दूतावासाने सांगितले आहे.
हेही वाचा – भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी जाहीर; महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावाचं काय?
९,००० भारतीय अडकले –
इराणमध्ये सध्या सुमारे ९,००० भारतीय नागरिक असून त्यात विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या सर्वांना सध्याच्या बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. भारत सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून आवश्यकतेनुसार पुढील उपाययोजना केल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले.





