Gujarat : गुजरातमध्ये ‘चंडीपुरा’ व्हायरसने 12 मुलांचा मृत्यू; अद्याप देखील लस नाही
गुजरातमध्ये गेल्या महिन्यात 'चंडीपुरा विषाणू'मुळे 12 मुलांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तीन मुलांना चंडीपुरा विषाणूची लागण झाली होती.

Gujarat – गुजरातमध्ये गेल्या महिन्यात ‘चंडीपुरा विषाणू’मुळे 12 मुलांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तीन मुलांना चंडीपुरा विषाणूची लागण झाली होती.
इतर नऊ मुलांचाही मृत्यू याच विषाणूमुळे झाल्याचा संशय आहे, परंतु अहवाल अद्याप प्रलंबित आहे. गांधीनगर, साबरकांठा, खेडा, अरवली आणि पंचमहाल जिल्ह्यांमध्ये संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
या प्राणघातक विषाणूमुळे आतापर्यंत तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. यापैकी दोन मुलांचा मृत्यू गोध्रामध्ये आणि एकाचा राजस्थानमधील हिम्मतनगर येथे झाला. बाधित भागांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रफुल्ल पानसरिया यांनी दिली.
संशयित लक्षणे असलेल्या एकूण सहा मुलांच्या मृत्यूची नोंद हिम्मतनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाली आहे, तर तीन मुलांचा मृत्यू गोध्रा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाला. यापैकी दोन मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाले.
आतापर्यंत 27 संशयित रुग्णांचे नमुने गांधीनगरला पाठवण्यात आले असून, त्यापैकी 19 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी सात जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या सात मुलांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे, तर चार जणांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित आठ नमुन्यांची तपासणी सुरू आहे. तसेच, पंचमहाल जिल्ह्यात आतापर्यंत विषाणूचे एकूण 13 संशयित रुग्ण आढळले आहेत.
महिसागर जिल्ह्यातील एक मूल व्हेंटिलेटरवर आहे. पाच मुलांवर सध्या गोध्रा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. उर्वरित चार मुलांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, असे पंचमहालचे विभागीय उपसंचालक डॉ. सुरेंद्र जैन यांनी सांगितले.





