करोना लढ्यासाठी जिल्हा प्रशासनाला 115 कोटींचा निधी

पुणे (प्रतिनिधी) – करोनाबाधित रुग्णांसाठी उपचार करण्यासाठी तसेच आवश्यक त्या साधनसामुग्री खरेदी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने विविध माध्यमातून आतापर्यंत 115 कोटी 69 लाखांचा निधी करोनाच्या लढ्यासाठी उपलब्ध करून दिला आहे.
राज्य शासनाने आतापर्यंत विविध टप्प्यांत करोना मुकाबल्याकरिता 23 कोटी 40 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. आयसीयू युनिट यंत्रसामुग्री, औषध खरेदी, ऑक्सिजन गॅस पाइपलाइन, वातानुकूलीत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजनातून ससून रुग्णालयाला 16 कोटी 16 लाख निधी उपलब्ध करून दिला.
जिल्हा शल्य चिकित्सकांना औषधे व यंत्रसामुग्री खरेदीसाठी 4 कोटी 7 लाख रुपये तर, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना औषधे व यंत्रसामुग्री तसेच जीवनसत्व विषयक औषधे खरेदीसाठी 7 कोटी 89 लाख रुपयांचा निधी देण्यात आला. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये ससून रुग्णालयाला विद्युत विषयक कामे व 2 हजार 500 करोना टेस्ट किट खरेदीसाठी 1 कोटी 71 लाख रुपये, जिल्हा शल्य चिकीत्सक यांना 9 ग्रामीण रुग्णालयांना सेंट्रल ऑक्सिजन गॅस पाइपलाइन तसेच औषधे व यंत्रसामुग्री खरेदीसाठी 11 कोटी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना खासगी दवाखान्यांना संदर्भित केलेल्या रुग्णांच्या औषधोपचार खर्चाच्या प्रतीपूर्तीसाठी 5 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.
जिल्हा वार्षिक नियोजनातून सन 2019-20 मध्ये एकूण 28 कोटी 12 लाख आणि आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 17 कोटी 71 लाख असा एकूण 45 कोटी 83 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.





