Pune District : बारामतीत ११० अभियंत्यांचा सेफ्टी मंत्र
Pune District : कार्यक्रमातील प्रमुख तांत्रिक सत्रात व्हीपीकेबीआयइटी, बारामतीचे असोसिएट प्रोफेसर डॉ. समाधान जी. मोरखडे यांनी ‘अर्थक्वीक अॅनॅलिसिस अॅंड डिझाइन आॅफ स्ट्रक्चर’ या विषयावर मार्गदर्शन केले.

बारामती : स्ट्रक्चरल सेफ्टी, गुणवत्तापूर्ण बांधकाम आणि भूकंपरोधक संरचनांच्या उभारणीबाबत तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी बारामतीत सात तालुक्यांतील ११० हून अधिक अभियंते एकत्र आले. प्रोफेशनल स्ट्रक्चरल इंजिनिअर्स असोसिएशन–बारामती रिजन सेंटर (पीएसइए बीआरसी) आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल कृष्णासागर येथे इंजिनिअर्स डे सोहळा व तांत्रिक चर्चासत्र उत्साहात पार पडले.
बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, फलटण, श्रीगोंदा आणि कर्जत-जामखेड या सात तालुक्यांतील स्ट्रक्चरल इंजिनिअर्स, सिव्हिल इंजिनिअर्स, वास्तुविशारद, बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार तसेच तांत्रिक क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी अभियंता विकास निर्मळ यांनी संकल्पित व लिखित केलेला ‘बारामतीचा विठ्ठल’ हा विशेष श्राव्य-दृश्य माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. महाराष्ट्रासह बारामतीच्या विकासप्रवासातील विविध पैलू आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीशी संबंधित आठवणी या माहितीपटातून मांडण्यात आल्या. माहितीपटाच्या सादरीकरणाने उपस्थितांना अजित पवार यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा मिळाला.
पीएसइएचे राष्ट्रीय अध्यक्ष शेषराव कदम आणि राष्ट्रीय सचिव जय कदम यांनी अभियंत्यांना इंजिनिअर्स डेच्या शुभेच्छा देत सामाजिक व व्यावसायिक जबाबदारी, स्ट्रक्चरल सेफ्टी, बांधकामातील गुणवत्ता, व्यावसायिक शिस्त आणि तांत्रिक ज्ञान अद्ययावत ठेवण्याच्या गरजेवर मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थित अभियंते व तज्ज्ञांमध्ये स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच्या विविध विषयांवर चर्चा झाली.
कार्यक्रमातील प्रमुख तांत्रिक सत्रात व्हीपीकेबीआयइटी, बारामतीचे असोसिएट प्रोफेसर डॉ. समाधान जी. मोरखडे यांनी ‘अर्थक्वीक अॅनॅलिसिस अॅंड डिझाइन आॅफ स्ट्रक्चर’ या विषयावर मार्गदर्शन केले. भूकंपप्रवण परिस्थितीत इमारतींचे विश्लेषण व डिझाईन, स्ट्रक्चरल बिहेवियर, डक्टाइल डिटेलिंग, RCC स्ट्रक्चर्समधील आवश्यक खबरदारी तसेच भारतीय मानकांनुसार डिझाईन व बांधकाम करताना घ्यावयाच्या तांत्रिक बाबी त्यांनी स्पष्ट केल्या.
तांत्रिक सत्रानंतर झालेल्या चर्चेत आयएस कोडस् , आरसीसी डिझाईन, भूकंपरोधक बांधकाम, डक्टाइल डिटेलिंग, काँक्रीट गुणवत्ता, साइट एक्झिक्युशन आणि स्ट्रक्चरल सेफ्टी या विषयांवर सविस्तर विचारविनिमय झाला. प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्रातील अनुभव आणि तांत्रिक ज्ञानाची देवाणघेवाण झाल्याने चर्चासत्र अभियंत्यांसाठी उपयुक्त ठरले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी शहराच्या नियोजनबद्ध आणि सुरक्षित विकासासाठी तांत्रिक क्षेत्रातील व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक अमोल कावळे तसेच बांधकाम क्षेत्रातील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष दिलीप यादव यांनी केले. सूत्रसंचालन व सत्राचे संयोजन सल्लागार विकास निर्मळ यांनी केले. सचिव सूरज चांदगुडे यांनी आभार मानले. खजिनदार गौरव जाधव आणि कार्यकारिणी सदस्यांनी कार्यक्रमाच्या नियोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली.





