इस्लामाबाद : पाकिस्तानी सैन्यावर मंगळवारी आणि बुधवारच्या रात्री मोठा हल्ला झाला. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यात अकरा पाकिस्तानी सैनिक ठार झाले आणि अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी सैन्य अफगाणिस्तान सीमेवर टीटीपीविरुद्ध कारवाई करत होते, त्यादरम्यान ही चकमक झाली. पाकिस्तानी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत १९ टीटीपी दहशतवादीही ठार झाले. गेल्या काही महिन्यांत टीटीपीने पाकिस्तानी सुरक्षा दलांवर आपले हल्ले लक्षणीयरीत्या वाढवले आहेत. त्यातूनच कालच्या हल्ल्याची ही घटना घडली. वायव्य कुर्रम जिल्ह्यात प्रथम रस्त्याच्या कडेला बॉम्बस्फोट झाले आणि त्यानंतर गोळीबार झाला. हल्ल्याच्या संदर्भात पाकिस्तानी सैन्याने एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार या कारवाईदरम्यान दहशतवादीही मारले गेले असल्याचे सांगण्यात आले. हल्ल्यात लेफ्टनंट कर्नल आणि मेजर पदावरील दोन अधिकारीही मारले गेले. मेजर तैयब राहत यांच्यासह लेफ्टनंट कर्नल जुनैद आरिफ हे या कारवाईचे नेतृत्व करत होते. पाकिस्तानी नेता बिलाल आफ्रिदी यांनीही इंस्टाग्रामवर शहीद झालेल्या पाकिस्तानी सैनिकांसाठी एक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले की, लेफ्टनंट कर्नल जुनैद आरिफ (३९) आणि मेजर तैयब राहत (३३) नऊ शूर सैनिकांसह शहीद झाले. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या सैनिकांनी पाक लष्कराच्या काफिल्यावर हल्ला केल्याचा दावा या गटाने केला आहे. हा गट पाकिस्तानी सरकार उलथवून त्यांचे कठोर इस्लामिक राज्य स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, पाकिस्तानचा असा दावा आहे की हे दहशतवादी अफगाणिस्तानात प्रशिक्षण घेतात आणि पाकिस्तानमध्ये हल्ले करतात. मात्र अफगाणिस्तानने पाकिस्तानचे हे दावे कायमच फेटाळले आहेत.