पुणे जिल्हा | तीस वर्षांनी भरला दहावीचा वर्ग

भोर, (प्रतिनिधी) – भोर येथील राजा रघुनाथराव विद्यालयातील १९९४-९५ मधील इयत्ता दहावी अ आणि ब तुकडीच्या ४५ विद्यार्थ्यांनी एकत्र आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात शाळेला टिव्ही संच देऊन ३० वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भोर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रमोद गुजर, डॉ. सुरेश गोरेगावकर, मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे, उपमुख्याध्यापक सुरेश देशमाने, निलीमा मोरे,शैलजा सावंत, एन. टी. वाघ, व्ही. बी. वाघ, किरण घोडके,विश्वास निकम, संतोष दळवी उपस्थित होते.
वर्गातील शिक्षकांबरोबर घडलेले गमतीदार किस्से यांचे अमोल बागडे या विद्यार्थ्यांने फळ्यावर काढलेले हुबेहूब रेखीव व्यंगचित्रे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. संगीत खूर्ची सारखे विविध खेळ खेळत पुन्हा बालपणात सर्व रमून गेले होते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या शालेय जीवनातील आठवणी, गंमती जमती तसेच किस्से सांगून ऐकून मनमुराद आनंद लुटला.
दहावीत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.शाळेकडून सर्व माजी विद्यार्थ्यांना शाळेची प्रतिमा फ्रेम भेट देण्यात आली. एकमेकांची विचारपूस करून निरोप देताना पुन्हा भेटण्याचे आश्वासन देण्यात आले. या प्रसंगी वैशाली मांगडे-जाधव, बिना बागडे, प्रांजली सावंत, अमोल बागडे, प्रशांत कांटे, सचिन घोडके, अतुल शिवतरे, संतोष मादगुडे, समीर मोरे, भारती वाव्हाळे, वैशाली जोशी, ललित खळदकर, माजी विद्यार्थ्यी उपस्थित होते.





