10वी-12वीच्या निकालाची संभाव्य तारीख जाहीर; निकाल यंदा 10 दिवस आधीच…

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ मधील परीक्षांचे निकाल यंदा लवकर जाहीर होणार आहेत. मंडळातील सूत्रांनुसार, बारावीचा निकाल ९ मे रोजी, तर दहावीचा निकाल १५ मे रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी २० मे नंतर जाहीर झालेला निकाल यंदा १० दिवस आधीच विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे.
यंदा बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून घेण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, कोकण, अमरावती आणि लातूर विभागातील उत्तरपत्रिकांचे तपासणी कार्य ८ एप्रिलपर्यंत पूर्ण झाले. मंडळाने वेळेत तपासणीसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने सर्व उत्तरपत्रिका तपासून बोर्डाकडे जमा झाल्या आहेत.
प्रवेश प्रक्रियेला गती –
बारावीचा निकाल १५ मे रोजी जाहीर झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया लगेच सुरू होणार आहे. तसेच, दहावीचा निकाल येण्यापूर्वीच अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल. महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडेल. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी सुट्टीचे नियोजन करताना या तारखांचा विचार करणे सोयीचे ठरेल.
शिक्षण मंडळाने अद्याप अधिकृत तारखांची घोषणा केलेली नसली, तरी सूत्रांच्या माहितीनुसार मे महिन्यातच निकाल जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जूनमध्ये पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याने यंदा निकाल लवकर जाहीर करण्यावर मंडळाचा भर आहे.





