करोनाबाधितांमध्ये 108 पालिका कर्मचारी

सर्वाधिक संसर्ग स्वच्छता कर्मचाऱ्यांना
पुणे – करोना महामारीतही शहर स्वच्छता तसेच अत्यावश्यक सेवांसाठी झटणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांवर करोनाचा विळखा वाढतच आहे. शहरातील एकूण करोना बाधितांच्या तुलनेत पालिकेच्या 1 टक्का कर्मचाऱ्यांना करोना संसर्ग झाला आहे. यात आतापर्यंत 108 कर्मचारी बाधित झाले असून, त्यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बाधा झालेल्यांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा एकूण आकडा 44 वर गेला आहे.
करोनाची साथीतही महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचे काम सुरूच आहे. त्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त, सफाई सेवक, बिगारी, सुरक्षा रक्षक, समूह संघटिका, मुकादाम, बहुद्देशीय कामगार, फिटर, आया असे कर्मचारीही नियमितपणे कामावर येत आहेत. तर यातील बहुतांश कर्मचारी प्रतिबंधित क्षेत्रातील आहेत. त्यामुळे कर्तव्य निभावताना आतापर्यंत सुमारे 10 कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 108 जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यातील 53 जणांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर तर अजूनही 45 जणांवर उपचार आहेत.
नातेवाईकांना मदत द्या
गेल्या तीन महिन्यांत महापालिकेच्या 10 कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यात 8 कर्मचारी सफाई करणारे आहेत. या कर्मचाऱ्यांना बाधा झाली तेव्हाही हे कर्मचारी नियमितपणे आपले काम तक्रारीविना निभावत होते. या कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिकेने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे 1 कोटींची आर्थिक मदत अथवा एका वारसाला महापालिकेची नोकरी आणि 75 लाखांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. प्रशासनाकडून आतापर्यंत 10 मधील 7 कार्मचाऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव तयार केला असला, तरी अद्याप एकाही कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना मदत मिळालेली नाही.




