108 Ambulance Station : मोरगावच्या १०८ रुग्णवाहिका स्टेशनला हिरवा कंदील; रोहिणी कदम यांच्या पाठपुराव्याला यश
108 Ambulance Station : हृदयविकार, अपघात आणि गंभीर आजारांमध्ये रुग्णांना आता गोल्डन अवरमध्ये मिळणार उपचार; ग्रामीण भागातील वर्षांची प्रतीक्षा संपली.

108 Ambulance Station – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार व युवा नेते जय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या रोहिणी संदीप कदम (ढोले) यांच्या प्रयत्नातून मोरगाव परिसरातील नागरिकांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा १०८ रुग्णवाहिकेचे कायमस्वरूपी स्टेशन मंजूर करण्यात आले आहे. आपत्कालीन आरोग्य सेवा वेळेत उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी संदीप कदम (ढोले) यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
मोरगाव येथे आपत्कालीन वैद्यकीय सेवा १०८ रुग्णवाहिकेचे कायमस्वरूपी स्टेशन मंजूर करण्याबाबत दिलेल्या निवेदनाची प्रशासनाने दखल घेतली असून जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा रुग्णालय पुणे यांनी संबंधित मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद सदस्या रोहिणी कदम (ढोले) यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना निवेदन देत मोरगाव येथे १०८ रुग्णवाहिकेचे कायमस्वरूपी स्टेशन सुरू करण्याची मागणी केली होती. मोरगाव- माळेगाव – नीरा हा मार्ग राज्य महामार्ग असून या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले होते.
या मार्गावर दर महिन्याला सरासरी ८ ते १० अपघात होत असल्याने तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती. सर्वात जवळची १०८ रुग्णवाहिका बारामती येथे उपलब्ध असल्याने मोरगाव परिसरात आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका पोहोचण्यासाठी ३५ ते ४५ मिनिटांचा कालावधी लागत होता. अपघात, हृदयविकार,गंभीर आजार किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत वेळेत उपचार मिळणे अत्यंत आवश्यक असताना रुग्णवाहिका उशिराने पोहोचत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत होती.
रोहिणी कदम (ढोले) यांनी दिलेल्या निवेदनानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून २६ मे २०२६ रोजी संबंधित पत्र जारी करण्यात आले आहे. या पत्रामध्ये मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गैरसोय दूर होणार
मोरगाव व पंचक्रोशीत अनेक वर्षांपासून या भागात आपत्कालीन रुग्णवाहिकेची गरज व्यक्त केली जात होती.आता प्रशासनाने सकारात्मक पावले उचलल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.लवकरात लवकर मोरगाव येथे १०८ रुग्णवाहिकेचे कायमस्वरूपी स्टेशन सुरू होणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.





