100th Marathi Sahitya Sammelan: अखेर ठरलं! पुणे विद्यापीठात रंगणार शंभरावे साहित्य संमेलन; तारखाही झाल्या जाहीर
100th Marathi Sahitya Sammelan: एस. पी. आणि फर्ग्युसन कॉलेजची पाहणी केल्यानंतर स्थळ निवड समितीकडून पुणे विद्यापीठाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब.

100th Marathi Sahitya Sammelan – पुण्यात होणारे १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२७ ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. याविषयी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी संमेलनाचे संयोजक आणि समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर उपस्थित होते. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी पुण्यात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत संमेलनाचे स्थळ आणि तारखा याबाबत सर्व सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. यापूर्वी शनिवारी (दि. १३ जून) रोजी स्थळ निवड समितीने एस. पी. महाविद्यालय, फर्गसन महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर शिक्कामोर्तब करण्यात आले. संमेलनापूर्वी नांदी शंभराव्या साहित्य संमेलनाची या उपक्रमातून पुणे, मुंबई वगळता जेथे साहित्य संमेलने झाली आहेत,
अशा महाराष्ट्रातील ४८ ठिकाणांसह महाराष्ट्राच्या विविध भागांत संमेलनपूर्व ९९ साहित्यिक उपक्रमांद्वारे शंभराव्या साहित्य संमेलनाची नांदी होणार आहे. १५ ऑगस्ट ते १५ जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जातील, असे सोमण यांनी सांगितले.पुण्याच्या बाहेरून येणाऱ्या साहित्यिकांसाठी निवासाची सोय याठिकाणी करण्यात येणार आहे. त्यासाठी दीडशे खोल्या उपलब्ध आहेत. आता संयोजक समर्थ युवा फाउंडेशन आहे; परंतु सहसंयोजक आणि अन्य गोष्टीही अद्याप ठरायच्या असल्याचे सोमण यांनी सांगितले.
अध्यक्ष निवडीची प्रक्रिया ऑगस्टपासून
साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया ऑगस्टपासून सुरू होईल. सर्व संलग्न मंडळांकडून अध्यक्षपदासाठी नावे मागविण्यात येतील. त्यानंतर त्यावर निवड समिती निर्णय घेईल, असे सोमण यांनी सांगितले.
राजकीय हस्तक्षेप टाळण्याचा प्रयत्न
संमेलन वेगवेगळ्या कारणाने गाजतेच; परंतु अलिकडे राजकीय हस्तक्षेपामुळे ते जास्त गाजते. याविषयी विचारले असता सोमण म्हणाले, की राजकीय हस्तक्षेप टाळण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत; परंतु जर राजकीय व्यक्ती राजकारण बाजूला ठेवून साहित्य रसिक म्हणून तेथे आली, तर त्यांचे स्वागतच करू.
महामंडळाची प्रथा मोडणार नाही
कार्यक्रमाची आखणी करताना महामंडळाने घालून दिलेले नियम, प्रथा, परंपरा नक्कीच मोडणार नाही; परंतु संमेलनात वेगळेपण कसे येईल, याचा प्रयत्न केला जाईल. हे संमेलन हायटेकपेक्षा अधिक संस्कृती जपणारे असेल, असे सोमण यांनी नमूद केले.





