Vidrohi Sahitya Sammelan – साताऱ्यात पार पडलेल्या पंधराव्या विद्रोही साहित्य संमेलनाचा रविवारी तब्बल १९ ठराव मंजूर करून आक्रमक आणि संघर्षशील वातावरणात शानदार समारोप करण्यात आला. येथील कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या या संमेलनात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय प्रश्नांवर विद्रोही चळवळीने स्पष्ट भूमिका घेत शासनाच्या धोरणांवर जोरदार टीका केली. संमेलनाध्यक्ष शाहीर संभाजी भगत, कवी बाहेरू सोनवणे, डॉ. भारत पाटणकर, अॅड. वर्षा देशपांडे, कॉम्रेड बाबुराव गुरव, डॉ. प्रशांत पन्हाळकर, अॅड. राजेंद्र गलांडे, विजय मांडके यांच्यासह विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॉम्रेड बाबुराव गुरव यांनी ठरावांचे वाचन केले. उपस्थित प्रतिनिधींनी हात उंचावून सर्व ठरावांना एकमुखी मंजुरी दिली. संमेलनात पुण्यातील शनिवारवाडा परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा सिंहासनाधिष्ठित भव्य पुतळा उभारण्याची मागणी करण्यात आली. तसेच मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार फडकवणारे महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचाही ठराव मंजूर करण्यात आला. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारा शक्तिपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा, अशी ठाम मागणी संमेलनातून करण्यात आली. यावेळी कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. समारोपासाठी उपस्थित राहिलेल्या प्रशांत आंबी यांचे कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी बोलताना कॉम्रेड बाबुराव गुरव यांनी “संपूर्ण बहुजन समाज आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे,” असा विश्वास व्यक्त केला. विद्रोही साहित्य संमेलन, सातारा शाहू महाराजांच्या स्मारकासह बहुजन प्रश्नांवर ठाम भूमिका संमेलनात साताऱ्यात प्रतिसरकारचे भव्य स्मारक उभारणे, मराठी शाळा बंद होऊ न देणे, पंढरपुरातील विठ्ठल पूजा वारकरी अभंगातूनच करण्याची परंपरा कायम ठेवणे, एसटी महामंडळाला आर्थिक मदत देऊन पूर्वपदावर आणणे, छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या लेखक विश्वास पाटील यांचा निषेध करणे, भीमाबाई स्मारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रश्न मार्गी लावणे, रायगडावर छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक उभारणे, आदिवासी प्रवर्गाची धर्मकोडच्या आधारे नोंदणी करणे तसेच बेळगावसह मराठी मुलुख महाराष्ट्रात आणण्यासाठी संघर्ष उभारण्याचे ठराव मंजूर करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. संघर्षाच्या निर्धाराने संमेलनाचा समारोप समारोपप्रसंगी डॉ. भारत पाटणकर यांनी विद्रोही चळवळीची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “शोषित, वंचित आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी अशा संघर्षशील चळवळी उभ्या राहणे ही काळाची गरज आहे. संघटनात्मक ताकद उभी करून हे प्रश्न राष्ट्रीय व्यासपीठावर नेणे आणि हा विद्रोही वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.”