राजस्थानमध्ये 100 युनिट वीज मोफत; निवडणुकीपूर्वी गेहलोत यांचे ‘ब्रह्मास्त्र’

जयपूर – “फ्रीबीज कल्चर’ अर्थात “रेवडी उधळणे मोहिमेचा’ नवा अंक राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लिहिला आहे. राज्यातील 1.10 कोटी घरगुती वीज ग्राहकांना 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा त्यांनी केली असून, ही योजना 1 मे 2023 पासूनच्या वीज बिलांना लागू असेल. सध्या राज्यातील ग्राहकांना 50 युनिट वीज मोफत मिळते आहेच. ही तरतूद मागील अर्थसंकल्पात करण्यात आली होती.
याशिवाय या सर्व घरगुती ग्राहकांना प्रोत्साहन दिले जात आहे की, जे ग्राहक वीजेचा वापर 200 युनिटपर्यंत मर्यादित ठेवतील, त्यांचे 100 युनिट मोफत असतील, त्याशिवाय त्यांचे निश्चित शुल्क आणि 100 ते 200 युनिटपर्यंतचे इतर शुल्क सरकारकडून देण्यात येईल. त्यामुळे त्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
गेहलोत यांनी स्पष्ट केले की भविष्यात ग्राहकांसाठी 100 युनिटपर्यंत वीज पूर्णपणे मोफत असेल आणि 200 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. आता त्यांना कोणतेही निश्चित शुल्क भरावे लागणार नाही. आता मला आशा आहे की या निर्णयामुळे एक कोटी 10 लाखांहून अधिक कुटुंबांना दिलासा मिळेल.
कॉंग्रेसने हिमाचल प्रदेश निवडणुकीत वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. तेथेही त्यांना सरकार स्थापन करण्यात यश आले. छत्तीसगड कॉंग्रेसने 2018 च्या निवडणुकीत विजेबाबत अशीच घोषणा केली होती, त्याची अंमलबजावणी करून छत्तीसगडचे कॉंग्रेस सरकार ‘वीज बिल निम्मे’ नावाची योजना चालवत आहे. यामध्ये 400 युनिटपर्यंत विजेच्या वापरावर निम्मे बिल माफ करण्यात आले आहे.
डिसेंबर 2018 मध्ये कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर ही योजना 1 मार्च 2019 पासून सुरू करण्यात आली. दुसरीकडे, छत्तीसगडमध्ये एकल बत्ती कनेक्शन योजनेंतर्गत दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना दरमहा 30 युनिट वीज मोफत दिली जात आहे. राजस्थानसह मध्य प्रदेशात या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत, तेथे कॉंग्रेस सत्तेत नाही. तिकडे कॉंग्रेसने आपले सरकार आल्यास 100 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे.
अशी असेल योजना…
समजा एखाद्या ग्राहकाचा वीज वापर दरमहा 100 युनिट्सपर्यंत असेल, तर त्याचे वीज बिल शून्य येईल. त्याला कसलेही पैसे जमा करावे लागणार नाहीत. यापूर्वी केवळ 50 युनिटपर्यंत वीज मोफत होती. उर्वरित 50 युनिटवर सुमारे 9 रुपये प्रति युनिट म्हणजे सुमारे 350 रुपये वीज बिल भरावे लागत होते.
म्हणजेच 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकाला आता 350 रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळणार आहे. एकूण बिल सुमारे 9 रुपये प्रति युनिट येते. त्यामुळे ग्राहकाला 900 रुपयांपर्यंतची संपूर्ण बचत मिळेल.





