अमेरिकेत परदेशी औषधांवर 100% टॅरिफ; भारतावर होणारा परिणाम आकडेवारीतून समजून घ्या

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी एका नव्या निर्णयाने खळबळ उडवून दिली. त्यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या विदेशी औषधांवर १०० टक्के आयातकर (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली. हा कर १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे अनेक देशांना आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. सध्या अमेरिका सर्वाधिक औषधे आयर्लंडमधून आयात करतो. वर्ल्ड इंटिग्रेटेड ट्रेड सोल्युशन (WITS) च्या २०२३ च्या अहवालानुसार, अमेरिकेने आयर्लंडमधून ३६ अब्ज डॉलरच्या औषधांची आयात केली होती.
या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम आयर्लंडवर होणार असला, तरी भारतही यापासून अलिप्त राहणार नाही. औषधांच्या निर्यातीत भारताचा अमेरिकी बाजारात महत्त्वाचा वाटा आहे, विशेषत: जेनेरिक औषधांच्या बाबतीत. भारत अमेरिकेच्या औषधविषयक गरजांचा मोठा हिस्सा पूर्ण करतो, आणि यात जेनेरिक औषधांचे प्रमाण लक्षणीय आहे.
अमेरिकेच्या औषध आयातीतील भारताचा वाटाखालील तक्त्यात २०२३ मधील अमेरिकेच्या औषध आयातीचे प्रमुख देश आणि त्यांचा हिस्सा दर्शविला आहे :
| देश | मूल्य (अब्ज अमेरिकी डॉलर) | हिस्सा (%) |
|---|---|---|
| आयर्लंड | 73.3 | 29.70% |
| स्वित्झर्लंड | 21.7 | 8.80% |
| सिंगापूर | 19.3 | 7.80% |
| जर्मनी | 17.3 | 7.00% |
| भारत | 13.1 | 5.30% |
| बेल्जियम | 12.7 | 5.20% |
| इटली | 12.2 | 4.90% |
| चीन | 9.3 | 3.80% |
| जपान | 7.5 | 3.10% |
| ब्रिटन (UK) | 7.4 | 3.00% |
भारताचा अमेरिकी बाजारातील हिस्सा ५.३० टक्के आहे. हा आकडा कमी वाटत असला, तरी जेनेरिक औषधांच्या बाबतीत भारताची भूमिका महत्त्वाची आहे. एका अहवालानुसार, भारत अमेरिकेच्या ४० टक्के जेनेरिक औषधांच्या गरजा पूर्ण करतो. २०१५ पासून आतापर्यंत भारताने अमेरिकेला १०.५ अब्ज डॉलरच्या औषधांची निर्यात केली आहे, जी एकूण औषध निर्यातीच्या सुमारे एक-तृतीयांश आहे.
भारतीय फार्मा कंपन्यांवर परिणामभारतातील प्रमुख फार्मा कंपन्या अमेरिकी बाजारावर अवलंबून आहेत. त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा जेनेरिक औषधांमधून येतो. खालील तक्त्यात काही प्रमुख कंपन्यांचा अमेरिकी बाजारातील वाटा दर्शविला आहे :
| कंपनीचे नाव | अमेरिकेतून कमाईचा हिस्सा (एकूण महसुलाच्या अंदाजे %) | मुख्य निर्यात/कारोबार |
|---|---|---|
| डॉ. रेड्डीज लॅब्स | 30–50% | जनरिक औषधे |
| सन फार्मा | 30–50% | जनरिक व ब्रँडेड औषधे |
| ल्यूपिन | 30–50% | जनरिक औषधे |
| अरबिंदो फार्मा | 30–50% | जनरिक औषधे |
| सिप्ला | – | रेस्पिरेटरी व अँटीव्हायरलसह जनरिक औषधे |
| जाइडस लाइफसाइंसेज | 30–50% | जनरिक औषधे |
| बायोकॉन | – | बायोसिमिलर, जनरिक व ब्रँडेड औषधे |
| ग्लेनमार्क फार्मा | – | जनरिक औषधे |
| ग्लॅंड फार्मा | 30–50% | इंजेक्शन योग्य जनरिक औषधे |
जाणकारांचे मत आहे की, हा टॅरिफ लागू झाल्यास भारतीय कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढेल, ज्यामुळे त्यांचा नफा कमी होईल. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, १०० टक्के टॅरिफमुळे या कंपन्यांच्या कमाईत ५ ते १० टक्के घट होऊ शकते.
अमेरिकेलाही फटका –
हा टॅरिफ केवळ भारतालाच नव्हे, तर अमेरिकेलाही प्रभावित करेल. अमेरिकेच्या जेनेरिक औषध आयातीपैकी ४५ टक्के भारतातून येतात. भारतातून मिळणाऱ्या स्वस्त औषधांमुळे अमेरिकेला मोठा फायदा होतो. एका अहवालानुसार, २०२२ मध्ये अमेरिकी आरोग्य यंत्रणेने २१९ अब्ज डॉलरची बचत केली होती. टॅरिफमुळे औषधांच्या किमती वाढतील, ज्यामुळे अमेरिकी बाजारात औषधांची उपलब्धता कमी होऊ शकते. यामुळे अमेरिकी रुग्णालयांना नवीन पुरवठादार शोधावे लागतील, जे सोपे नाही.
दरम्यान, ट्रम्प यांच्या या धोरणामुळे भारतीय फार्मा कंपन्यांना आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागेल, तर अमेरिकेत औषधांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक औषध बाजारात नवे बदल दिसू शकतात. भारतीय कंपन्या आता अमेरिकेत उत्पादन वाढवण्याच्या दिशेने विचार करत आहेत, परंतु याचा दीर्घकालीन परिणाम काय असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.





