Manchar : आंबेगाव तालुक्यात शंभर टक्के दुष्काळी पंचनामे करणार
Manchar : दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी उत्सवांवरील खर्चात बचत करून मुख्यमंत्री सहायता निधीसह गरजूंना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मंचर : आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश झाल्यानंतर आंबेगाव तालुक्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांचे शंभर टक्के पंचनामे करून त्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवार, दि.१९ रोजी मंचर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी उत्सवांवरील खर्चात बचत करून मुख्यमंत्री सहायता निधीसह गरजूंना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गव्हाण पूजन कार्यक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर केलेल्या टिकेमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर दिलगिरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले.
साखरेची सरासरी किंमत प्रतिकिलो ५० रुपये आणि इथेनॉलला प्रतिलिटर ७० रुपये दर मिळावा, या राजू शेट्टी यांच्या मागण्यांना पाठिंबा असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, ऊसाला पहिली उचल म्हणून पाच हजार रुपये देणे सध्या शक्य नसल्याचे स्पष्ट केले.हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण ९० ते ९५ टक्के भरले असले, तरी भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करून शेतकऱ्यांनी पीक आणि जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा बँकेसाठी आंबेगावातून मीच उमेदवार : दिलीप वळसे पाटील.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी आंबेगाव तालुक्यातून मीच उमेदवार असून, निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवीन नियमानुसार आगामी काळात जे निर्णय आवश्यक ठरतील, ते परिस्थितीचा आणि सर्व बाबींचा अभ्यास करून घेतले जातील. यामध्ये कोणतीही अडचण असल्याचे कारण नाही. निवडणूक जाहीर झाल्यानंतर योग्य त्या बाबींवर निर्णय घेतला जाईल, असेही वळसे पाटील यांनी नमूद केले.





