गुंतवणूकदारांची 100 कोटींची फसवणूक

पुणे – जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल 100 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. हे पैसे हवालामार्फत परदेशात पाठविण्यात आले. याप्रकणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) एका कुटुंबातील तीन व्यक्तींसह अन्य व्यक्तींवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी “ईडी’चे सहायक संचालक रत्नेशकुमार भुवनेश्वरलाल कर्ण (43) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद तुकाराम खुटे, संतोष तुकाराम खुटे, मंगेश खुटे (सर्व रा. निर्माण विवा सोसायटी, सिंहगड महाविद्यालयाजवळ, आंबेगाव बु.), किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडधे आणि अन्य साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनी आणि ग्लोबल ऍफिलेट बिझनेस नावाने सर्वसामान्य नागरिकांना प्रतिमहा दोन ते तीन टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवून खोटी स्कीम राबवली.
त्यांनी नागरिकांकडून थेट त्यांच्या खात्यात पैसे न घेता वेगवेगळ्या बोगस बॅंक खात्यांमध्ये पैसे घेतले. पैसे गुंतवणाऱ्यांना कमिशनचे आमिष दाखवून अन्य लोकांनाही स्किममध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडले. यामुळे पैसे गुंतवणाऱ्यांचे नातेवाईक आणि मित्र मंडळी मोठ्या प्रमाणात फसले गेले आहेत. यातील मुख्य आरोपी विनोद खुटे याने फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली काना कॅपिटल नावाची कंपनी बनवली.
गुंतवणूकदारांशी झुम आणि ऑनलाइन मीटिंगच्या माध्यमातून बैठक घेऊन चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दिले. त्यासाठी अनेक बनावट फर्म तयार करून वेगवेगळ्या पाच खात्यांमध्ये पैसे भरायला लावले. त्याने काही दिवस गुंतवणूकदारांना फॉरेक्स ट्रेडिंग करायला लावून त्यानंतर काना कंपनीचे संचलन बंद केले. हे पैसे हवालाच्या माध्यमातून परदेशात पाठवून 100 कोटी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे.





