Pakistan News – पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या पोलिसांनी गेल्या दोन दिवसात १० संशयितांचा खात्मा केला आहे. त्यामुळे पोलिसांबरोबरच्या चकमकींमध्ये गेल्या वर्षभरात ठार झालेल्यांची संख्या १,१०० इतकी झाली आहे. मात्र पंजाब प्रांतातील या चकमकींमधील सत्यतेबाबत पाकिस्तानमधील मानवी हक्क विषयक गट आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाकडून चिंता व्यक्त केली जाते आहे. मंगळवार आणि बुधवारी प्रांतभरात झालेल्या विविध चकमकींमध्ये १० संशयित ठार झाले, असे गुन्हे नियंत्रण विभागाने (सीसीडी) बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे. हे संशयित पंजाबमधील विविध पोलीस ठाण्यांअंतर्गत खून, बस दरोडे, लूटमार, हत्येचा प्रयत्न, खंडणी, पोलीस चकमकी आणि दरोड्यादरम्यान प्रतिकार करणाऱ्या नागरिकांना गोळी मारून जखमी करण्याच्या डझनभर प्रकरणांमध्ये सामील असलेले गुन्हेगार होते, असे या निवेदनात म्हटले आहे. पंजाबच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, मरियम नवाज यांनी गेल्या वर्षी प्रांतातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी क्राईम कंट्रोल डिपार्टमेंट अर्थात सीसीडीची स्थापना केली होती.