अखेर राज्यातील १० शिक्षण उपसंचालकांना पदोन्नत्या

पुणे – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पात्र ठरलेल्या शिक्षण उपसंचालकांना सहसंचालकपदी पदोन्नती देण्यासाठी तब्बल दहा महिन्याचा कालावधी लावला. अखेर आता पदोन्नत्यांना मुहुर्त लागला असून १० शिक्षण उपसंचालकांना पदोन्नत्या मिळाल्या आहेत. पदोन्नत्यांच्या माध्यमातुन संबधित अधिकाऱ्यांना सोयीच्या ठिकाणी नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.
राज्यातील १६ शिक्षण उपसंचालकांना त्यांच्या पदाच्या अनुभवाची तीन वर्षे डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण झाली होती. यातील पाच विभागीय शिक्षण उपसंचालकांना पदोन्नत्या नको होत्या. त्यांना आहे त्या पदावर व कार्यालयात आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ हवी होती. यासाठी आर्थिक मलिदा लाटण्यात मग्न असलेल्या काही विभागीय शिक्षण उपसंचालकांनी पदोन्नत्यांच्या प्रक्रियेत जाणीवपूर्वकपणे अडथळे आणण्यासाठी सतत प्रयत्न केले होते.
शालेय शिक्षण विभागातील शिक्षण उपसंचालकांनी शालेय शिक्षण विभागात महसुल विभागातील अधिकारी यांच्या नियुक्त्यांना विरोध दर्शविला होता. न्याय मिळावा यासाठी त्यांनी मॅट मध्ये धाव घेतली होती. त्यावर अनेकदा सुनावण्याही झाल्या. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातही सुनावणी झाली. त्यात संबंधित अधिकारी यांना पदोन्नत्या देण्याबाबतचे निर्देश मॅटने शासनाला दिले होते. त्याची गांभीर्याने दखल घेत शासनाने पदोन्नत्यांच्या आदेश विलंबाने का होईना पण जारी केले आहेत.
पुणे बोर्डातील सचिव औदुंबर उकिरडे , शिक्षण आयुक्तालयातील शिक्षण उपसंचालक हारुन अत्तार हे सेवा ज्येष्टतेनुसार यादीत वरच्या क्रमांकावर होते. या दोघांची चौकशांची प्रकरणे निकाली निघाली होती. मात्र तरीही त्यांना पदोन्नत्या देताना डावलण्यात आले असून त्यांच्यावर पात्र असतानाही अन्याय झाला असल्याची चर्चा पसरली आहे.
पदोन्नत्या मिळालेले अधिकारी व नियुक्ती कार्यालय –
सुधाकर तेलंग – लातूर बोर्ड अध्यक्ष, डॉ. सुभाष बोरसे – नाशिक बोर्ड अध्यक्ष, राजेश क्षीरसागर – कोल्हापुर बोर्ड अध्यक्ष, अर्चना कुलकर्णी – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत सहसंचालक, राजेंद्र अहिरे – मुंबई बोर्ड अध्यक्ष, डॉ.श्रीराम पानझाडे – माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयात सहसंचालक, अनिल साबळे – छत्रपती संभाजीनगर बोर्ड अध्यक्ष, रमाकांत काठमोरे – प्राथमिक शिक्षण संचालनालयात सहसंचालक, शिवलिंग पटवे – नागपुर बोर्डाचे अध्यक्ष याप्रमाणे शिक्षण उपसंचालकांना पदोन्नत्या देण्यात आलेल्या आहेत. मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांच्या पदस्थापनेबाबत स्वंतत्र आदेश काढण्यात येणार आहेत.





