’दिवाळी’त 1 कोटी लोकांनी केला ‘स्पेशल’ प्रवास… आता ‘छठ’ला घरी जायचंय? तर ‘या’ 7800 रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक लगेच तपासा!

नवी दिल्ली: सण-उत्सवादरम्यान लोकांची घरी पोहोचण्याची तीव्र इच्छा लक्षात घेऊन रेल्वेने यंदा दिवाळी आणि छठ पूजेसाठी १२ हजारहून अधिक विशेष गाड्यांच्या फेऱ्या चालवल्या आहेत. २० ऑक्टोबरपर्यंत यापैकी ४२११ फेऱ्या पूर्ण झाल्या असून, त्यातून तब्बल एक कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. म्हणजेच प्रत्येक गाडीत सरासरी दोन हजार प्रवासी होते.
छठसाठी मोठा प्रवास
या १२ हजार फेऱ्यांपैकी तब्बल ७८०० फेऱ्या आता प्रामुख्याने छठ पूजेसाठी आहेत. मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळूरू, अहमदाबाद अशा ११ प्रमुख शहरांमधून बिहार, झारखंड आणि पूर्वांचलसह इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी या सर्वाधिक ७८५२ फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
मध्य आणि उत्तर रेल्वे आघाडीवर
प्रवाशांची वाढती गर्दी पाहता, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याला मोठे आव्हान म्हटले आहे. मध्य रेल्वे (१९९८ फेऱ्या) आणि उत्तर रेल्वे (१९१९ फेऱ्या) हे विशेष गाड्यांच्या सर्वाधिक फेऱ्या चालवत आहेत. पश्चिम रेल्वेनेही १५०० हून अधिक फेऱ्या चालवल्या आहेत. गतवर्षीच्या ७७२४ फेऱ्यांच्या तुलनेत यंदा १२,०११ फेऱ्या चालवून प्रवाशांना सहज जागा उपलब्ध करून देण्याचा रेल्वेचा दावा आहे.
२४ तास ‘वॉर रूम’मधून देखरेख
रेल्वेचे १२ लाख कर्मचारी या कामात व्यस्त आहेत. प्रवाशांच्या आणि गाड्यांच्या प्रत्येक मिनिटाच्या हालचालीवर दिल्लीतील मास्टर वॉर रूमसह देशभरातील ८० वॉर रूममधून २४ तास लक्ष ठेवले जात आहे. दुसरीकडे, काही सोशल मीडियावरील गर्दीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने गेल्या पाच दिवसांत ४० हून अधिक व्हिडिओ बनावट घोषित करून त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.





