पुणे जिल्हा | 14व्या वित्त आयोगाचे एक कोटी पडूनच

आळेफाटा, {डी. बी. वाळुंज} – जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या खात्यांवर 14 व्या वित्त आगोगाच्या निधीतील 1 कोटी 12 लाख रुपयांपेक्षाही अधिक रकमेचा निधी अद्याप अखर्चित स्वरुपात दिसून येत आहेत. या निधीला खर्च करणेसाठी यापूर्वी एकदा मुदतवाढ देण्यात आली होती; परंतु तो खर्च न झाल्याने आता हा निधी पुन्हा माघारी जातो की काय, अशी धाकधूक ग्रामपंचायत प्रशासनास लागलेली आहे.
शासनाने ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक नागरिक, घटकाचा विकास व्हावा, या उदात्त हेतूने विविध वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायत खातेवर सदरचा निधी देण्याचे काम आजपर्यंत अनेक वर्षे केली असून या निधीतून जवळजवळ सर्वच गावांचा विकास झालेला दिसून येत आहे.
शासन हा निधी प्रत्येक गावाला लोकसंख्या व ग्रामपंचायतचे असणारे महसुली क्षेत्रफळ याचा अभ्यास करून या निधीचे वितरण करत असते. आत्तापर्यंत विविध वित्त आयोगाचे निधी आले आणि ते खर्ची देखील झाले आहेत; परंतु या 14 वित्त आयोगाच्या निधीला मुदतवाढ देऊन देखील यंदा हा निधी खर्च झालेला नाही. दरम्यान, हा निधी खर्च करण्यासाठी दि. 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत वेळ वाढवून देण्यात आला होता.
14 वित्त आयोगाच्या खर्चाला प्रथमत: जी मंजुरी देण्यात आली होती, ती तालुका कमिटीच्या अखातारीत होती. या आयोगाच्या मंजूर आराखड्यांची दुरुस्ती मंजुरी मात्र जिल्हा परिषदे होती, त्यामुळे हस्तलिखित आराखडा व संगणकीय म्हणजे ऑनलाइन मंजुरीत अनेक वेळा अडचणी आल्याची चर्चा देखील ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडून केली जाते.
त्यात दरम्यानच्या काळात सरपंचपदाचे कालावधी संपल्यामुळे बहुतांशी ग्रामपंचायत कार्यालयांवर शासनाच्या वतीने प्रशासक काम पाहत होते. या प्रशासक अधिका-यांना स्वत:चा पदभार सांभाळून एका-एका अधिकार्यास जवळपास 15 पेक्षा अधिकची गावे प्रशासक म्हणून पाहणे अतिशय अवघड झाले होते, यासह अन्य काही कारणांमुळे या 14 वित्त आयोगाच्या निधीला खर्च करणे राहून गेल्याचे अनेक ग्रामपंचायतींच्या कारभा-यांनी सांगितले.
दोन महिन्यांचा अधिकचा कालावधी मिळावा
अनेकांनी हा अखर्चित रक्कम खर्ची व्हावी, यासाठी विविध विकासकामांचे कार्यारंभ आदेश देखील देण्यात आले असून जवळपास सर्वच विकास कामे देखील पूर्ण किंवा पूर्णत्वाच्या दिशेने असून आता मात्र शासनस्तरावर या निधीच्या खर्चाला पुढील दोन महिन्याचा अधिकचा कालावधी मिळावा, अशी मागणी जुन्नर तालुक्यातील अखर्चित ग्रामपंचायत सरपंच व अधिका-यांची आहे.
अखर्चित आकड्यांची घेतली माहिती
अखर्चित आकड्यांबाबतची असणारी संपूर्ण तालुक्याची माहिती गट विकास अधिकारी श्रेणी-1 सचिन सूर्यवंशी यांनी घेतली असून जिल्हा परिषद कार्यालयाला कळविली आहे. याकडे सर्वच ग्रामपंचायत सरपंच यांचे लक्ष लागले असून स्थानिक लोकनेत्यांनी या कामी आपआपल्या स्तरावरून सहकार्य करावे, अशी देखील सरपंचांची मागणी आहे.





