पुण्यात कॅन्टीन भागीदारीच्या नावाखाली 1.32 कोटींची फसवणूक; एकाच कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा

पुणे : वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅन्टीनसह इतर व्यवसायात ५० टक्के भागीदारी देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची १ कोटी ३२ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवराज मधुकर शिंदे (वय २८, रा. दत्तनगर, आंबेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राजेश आनंद (वय ५२), वीणा राजेश आनंद (वय ४८), बर्खा राजेश आनंद (वय ३५), चांदणी राजेश आनंद (वय २६) आणि वंश राजेश आनंद (वय २३, सर्व रा. तिरंगा चौक, कात्रज) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शिवराज यांना भारती विद्यापीठ वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॅन्टीन, लॉन्ड्री आणि मेडिकल व्यवसायात ५० टक्के भागीदारी देण्याचे सांगितले. विश्वास बसावा यासाठी त्यांनी शिवराज यांची भारती हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. संजय ललवाणी यांच्याशी भेट घडवून आणली. तसेच, त्यांच्या कार्यालयातील ‘मामा’ नावाच्या व्यक्तीशी बोलणे सुरू असल्याचे सांगितले. यानंतर वेळोवेळी व्यवसायासाठी १ कोटी ३२ लाख ३० हजार रुपये उकळले. मात्र, प्रत्यक्षात आरोपींनी फसवणूक करून रहात्या घरातून पलायन केल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक खिलारे करत आहेत.





