Satara ZP Election : महाबळेश्वरचा ‘धनी’ कोण? बाळासाहेबांच्या तालमीतील ‘शिलेदार’ आमनेसामने; कोण मारणार बाजी?
Satara ZP Election : स्व. बाळासाहेब भिलारे यांच्यानंतर महाबळेश्वरच्या नेतृत्वाची पोकळी कोण भरून काढणार? त्यांच्याच तालमीत तयार झालेले नेते आता वेगवेगळ्या राजकीय झेंड्याखाली आमने-सामने.

Satara ZP Election : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला महाबळेश्वर तालुका सध्या राजकीयदृष्ट्या कमालीचा तापला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते स्व. बाळासाहेब भिलारे यांच्या निधनानंतर रिक्त झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी आणि तालुक्यावर आपली ‘कमांड’ प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्याच तालमीत तयार झालेले कार्यकर्ते आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
ही निवडणूक केवळ सत्तेची नसून, भिलारेंचा वारसा सांगणाऱ्या शिलेदारांच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.बाळासाहेब भिलारे यांनी महाबळेश्वर तालुक्यात कार्यकर्त्यांची एक मोठी फळी उभी केली होती. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. भिलारेंच्या तालमीतील हे दिग्गज आता वेगवेगळ्या राजकीय झेंड्याखाली आपली ताकद आजमावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व अजित पवार गटाकडून राजेंद्रशेठ राजपुरे, संजूबाबा गायकवाड, प्रवीण भिलारे, नितीन भिलारे,
तेजस्विनी भिलारे हे आजही राष्ट्रवादीच्या विचारधारेसोबत पाय रोवून उभे आहेत. शिवसेना(एकनाथ शिंदे गटाकडून संजय मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले आहे. भाजपकडून अनिल भिलारे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून ‘कमळ’ फुलवण्यासाठी कंबर कसली आहे. इतर शिलेदार: सुभाष सोंडकर, सुरेश जाधव यांसारखे नेतेही आपापल्या परीने निवडणुकीच्या मैदानात सक्रिय झाले आहेत.महाबळेश्वर पंचायत समितीचे ओबीसी महिला प्रवर्गासाठी झालेले आरक्षण हे यावेळच्या निवडणुकीचे मुख्य आकर्षण ठरले आहे.
भाजपने या जागेवर विशेष लक्ष केंद्रित केले असून, ही जागा आपल्याकडे खेचण्यासाठी सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे. दुर्गम भाग असूनही स्ट्रॉबेरी उत्पादन आणि पर्यटनाच्या माध्यमातून तालुक्याचा विकास करण्याचे आश्वासन सर्वच पक्षांकडून दिले जात आहे. बाळासाहेब भिलारे यांच्या पश्चात महाबळेश्वरचा ‘धनी’ कोण, याचा फैसला ही निवडणूक करेल. स्ट्रॉबेरीचा गोडवा आणि पर्यटनाचे वैभव लाभलेल्या या तालुक्यात आता राजकीय चुरस शिगेला पोहोचली असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
मुख्यमंत्र्यांचे ‘दरे’ कार्ड आणि मकरंद आबांचा प्रभाव
महाबळेश्वर तालुक्यावर पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीने आजवर तालुक्यावर पकड मजबूत ठेवली आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव ‘दरे’ हे महाबळेश्वर तालुक्यातच असल्याने, त्यांनी या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. साहजिकच, ‘पुत्र मातीचा’ विरुद्ध ‘प्रस्थापित नेतृत्व’ असा संघर्ष येथे पाहायला मिळत आहे.
महाबळेश्वरमध्ये राजकीय रणकंदन
राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या खांद्यावर सर्व निवडणुकीची जबाबदारी दिल्याची दिसून येत आहे. यामुळे संपूर्ण तालुका पिंजून काढण्यासाठी राजेंद्रशेठ राजपुरे यांनी आपल्या पायाला भिंगरी बांधली आहे. त्यातच भाजपने पल्या मंत्र्यांना महाबळेश्वर तालुक्यात दौरे करण्यासाठी सांगितल्यामुळे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सभा भिलारमध्ये झाली. खिंगर या ठिकाणी नरेंद्र पाटील यांनीही प्रचाराला सुरुवात केली.




