Satara: ना. शिवेंद्रसिंहराजेंचा नगरपालिकेकडून जाहीर सत्कार
Satara राजपथ आणि राधिका रोडचे काँक्रिटीकरण करण्यापूर्वी दोन्ही रस्ते पूर्णपणे खोदण्यात येणार आहेत. त्यानंतर अंतर्गत जलवाहिन्या, पाइपलाइन आणि विविध कनेक्शनची तपासणी करून आवश्यक कामे पूर्ण केली जातील.

Satara: सातारा शहराच्या विकासकामांना निधीची मोठी ताकद मिळवून देत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अवघ्या आठ दिवसांत 209.91 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. राजपथ, राधिका रोड, शाहू कला मंदिर आणि मेढा स्मशानभूमीसह विविध महत्त्वाच्या विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध झाल्याने शहराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे. या योगदानाबद्दल सातारा नगरपालिकेच्या पदाधिकार्यांच्यावतीने ना. शिवेंद्रसिंहराजे यांचा जाहीर सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, भाजपचे गटनेते अविनाश कदम, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक रवींद्र ढोणे, सुशांत महाजन, विजय देसाई आदी उपस्थित होते.
सातारा नगरपालिकेसाठी 124 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचेही शिवेंद्रसिंहराजे यांनी आभार मानले. मेढा स्मशानभूमीसाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, राजपथ आणि राधिका रोडचे संपूर्ण काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. तसेच शाहू कला मंदिराच्या नूतनीकरणासाठीही भरीव निधी उपलब्ध झाला आहे.
राजपथ आणि राधिका रोडचे काँक्रिटीकरण करण्यापूर्वी दोन्ही रस्ते पूर्णपणे खोदण्यात येणार आहेत. त्यानंतर अंतर्गत जलवाहिन्या, पाइपलाइन आणि विविध कनेक्शनची तपासणी करून आवश्यक कामे पूर्ण केली जातील. त्यानंतरच काँक्रिटीकरणाला सुरुवात होईल, असे ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले. ही कामे सुरू असताना नागरिक आणि व्यापार्यांना काही काळ गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे. मात्र, शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी नागरिकांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.





