सातारा | कोरेगाव मतदारसंघात १७ उमेदवार निवडणूक रिंगणात दहा जणांची माघार

कोरेगाव – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी दहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामध्ये डॉ. प्रिया महेश शिंदे आणि वैशाली शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे. आता निवडणूक रिंगणात १७ उमेदवार राहिले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित नाईक यांनी दिली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, निवडणूक नायब तहसीलदार सारिका शिंदे यावेळी उपस्थित होत्या.
सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासून उमेदवारांनी अर्ज माघार घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात गर्दी होती. डॉ. प्रिया महेश शिंदे, वैशाली शशिकांत शिंदे, ऍड. संतोष गणपत कमाने, शशिकांत धर्माजी शिंदे, अजित प्रदीप पवार, संजय बाबासाहेब भगत, सुधाकर भाऊराव फाळके, ऋषीराज जगन्नाथ कणसे, नितीन भरत बोतालजी आणि संजय शिवराम भोसले या दहा उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले.
एकूण १७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उपस्थित उमेदवार व प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत चिन्ह वाटप करण्यात आले. महेश संभाजीराजे शिंदे (शिवसेना), शशिकांत जयवंतराव शिंदे (राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), उमेश चव्हाण (राष्ट्रीय समाज पक्ष), चंद्रकांत जानू कांबळे (वंचित बहूजन आघाडी), संतोष रमेश भिसे (रिपब्लिकन सेना), अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या अनिकेत दत्तात्रय खताळ, उध्दव आत्माराम कर्णे, तुषार विजय मोतलिंग, दादासाहेब वसंतराव ओव्हाळ, महेश किसन शिंदे, महेश माधव कांबळे, महेश सखाराम शिंदे, महेश संभाजीराव शिंदे, सदाशिव सीताराम रसाळ, सचिन सुभाष महाजन, सोमनाथ शंकर आवळे आणि संदीप विष्णू साबळे हे चिन्ह देण्यात आले आहे, अशी माहिती अभिजित नाईक यांनी दिली.





