- मेडीकलमध्ये लागले फलक
- डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री न करण्याचे आदेश
पिंपरी – शहरातील अनेक मेडीकल दुकानांबाहेर सध्या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी याचे औषध मिळणार नसल्याचे फलक लावण्यात आले आहेत. “करोना’च्या प्रमुख लक्षणांमध्ये सर्दी, खोकला, ताप आणि अंगदुखी आहे. यामुळे या औषधांची थेट विक्री न करता लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची तपासणी करता यावी, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने केमिस्टांनी आता ग्राहकांसाठी फलकच लावले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने सर्व किरकोळ औषध विक्रेत्यांना औषध व सौंदर्य प्रसाधने कायद्यातंर्गत औषध विक्रेत्यांना आदेश दिले आहेत की, फ्लू, कफ, सर्दी, ताप, अंगदुखी याची औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करु नये, याबाबत पूर्वीच सूचना केल्या आहेत. परंतु त्याचे तंतोतत पालन होत नसल्याने पुन्हा आदेश देण्यात आले आहेत.
त्यानुसार या औषधांच्या विक्रीचा तपशील मेडीकल दुकानदारांना रोज सादर करावा लागणार आहे. अन्न व औषध प्रशासनाने यासाठी एक तक्ता तयार करुन दिला आहे, त्या तक्त्यात माहिती भरुन रोज ई-मेलद्वारे पाठवावी लागणार आहे.