लक्षवेधी : महाराष्ट्राच्या विस्तारणार्या क्षमता
जागतिक गुंतवणूक कंपनी ब्रुकफिल्ड प्रॉप्रटीज हीदेखील महाराष्ट्रात जीसीसी सुविधा स्थापन करण्यासाठी 1 अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक (Investment) करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

– हेमंत देसाई
Investment : जागतिक गुंतवणूक कंपनी ब्रुकफिल्ड प्रॉप्रटीज हीदेखील महाराष्ट्रात जीसीसी सुविधा स्थापन करण्यासाठी 1 अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक (Investment) करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. हे नवे सेंटर जगातील सर्वात मोठे असेल आणि त्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
नरेंद्र मोदी सरकारने विकसित भारताचे लक्ष्य ठेवले असले, तरीदेखील केवळ अर्थव्यवस्थेचा आकार हा निकष लक्षात घेतल्यास, भारत आज सहाव्या स्थानावर आहे. जागतिक महासत्तेचे स्वप्न ठेवण्यात (Investment) आले असले, तरी जागतिक बँकेने भारताचा समावेश अल्प-मध्य गटातच केला आहे! मात्र केवळ भारताचा विचार केला, तर दक्षिणेतील राज्ये प्रगतिपथावर असून, उत्तर भारतातील राज्ये खूपच मागे आहेत.
परकीय गुंतवणूक आकर्षित करून घेण्यात महाराष्ट्र क्रमांक एकवर असला, तरीदेखील यंदाच्या धुवाधार पावसात शहरातील पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडल्या आहेत. रस्ते, पूल, विमानतळ, रेल्वेमार्ग यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र हे काहीही असले, तरीदेखील राज्यात 2 लाख 56 हजार कोटी रुपयांच्या 18 विशाल व अतिविशाल प्रकल्पांसाठी विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या प्रकल्पांमुळे एक लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे. ही गोष्ट वास्तवात आल्यास, स्वागतच करावे लागेल.
भारत हा जगातील एक विशाल देश असून, येथील लोकांची क्रयशक्ती दिवसेंदिवस वाढत आहे. साक्षरता प्रसार वाढला असून, उच्च शिक्षितांच्या संख्येतही भर पडत आहे. ज्या देशाची क्रयशक्ती चांगली असते आणि जेथील कौशल्ये विकसित झालेली असतात, त्या देशाचे भविष्य उज्ज्वलच असते. अमेरिकेतील ई-कॉमर्स क्षेत्रातील अॅमेझॉन या महाकाय कंपनीने आगामी पाच वर्षांत भारतात 35 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
देशात एआय डेटा सेंटर उभारण्यासाठी गूगल 15 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तर भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्थेच्या, म्हणजेच एआयच्या विकासाला चालना देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनी व्यापक पायाभूत सुविधा विकास कार्यक्रम हाती घेणार आहे. त्यासाठी एआय क्षेत्रात दोन कोटी भारतीयांना ती कौशल्यविकासाचे धडे देणार आहे.
सध्या जगभरात मायक्रोसॉफ्टची 70 पेक्षा अधिक विभागीय डेटा सेंटर्स आहेत. या वाटचालीत मायक्रोसॉफ्ट ही कॉग्निजंट, इन्फोसिस, टीसीएस आणि विप्रो या कंपन्यांशी धोरणात्मक भागीदारी करणार आहे. या क्षेत्रातील 17.5 अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक ही कंपनीची आतापर्यंतची भारतातील सर्वात मोठी गुंतवणूक ठरणार आहे. त्यातून भारतात एआयसाठी आवश्यक अत्युच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उभ्या राहणार आहेत. भारत जगातील सर्वात गतिमान डिजिटल बाजारपेठांपैकी एक आहे.
भारतात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक सध्या महाराष्ट्रात होत आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टसारख्या कंपनीचे लक्ष राज्याकडे वळणार, हे स्वाभाविकच होते. आता मायक्रोसॉफ्टसोबत महाराष्ट्रात जीसीसी किंवा ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचे राज्य सरकारने ठरवले असून, महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टीने ही सुवार्ताच म्हणावी लागेल.
1.57 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले हे केंद्र सुमारे 20 लाख चौरसफुटांवर उभारले जाणार आहे. त्यातून एकूण 15 लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नाडेला यांनी महाराष्ट्र सरकारसोबत (Investment) विकसित केलेल्या उीळाश अखजड या प्लॅटफॉर्मचे विशेष सादरीकरण एका कार्यक्रमात करण्यात आले. महाराष्ट्राने तयार केलेल्या ‘चरीलश्रश’ प्लॅटफॉर्ममुळे सायबर आणि आर्थिक गुन्हे तीन-चार महिन्यांऐवजी फक्त 24 तासांत शोधता येऊ लागले आहेत.
महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात डिजिटल अरेस्टसह एपीके फाइल डाउनलोड करून सर्वसामान्यांना फसवण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय भर पडली आहे. दसरा-दिवाळीला ऑनलाइन वस्तू खरेदीवर डिस्काउंटच्या बहाण्यानेही गंडा घालण्यात आला आहे. समाजमाध्यम वापरकर्त्यांच्या मोबाइलवर एखाद्या ओळखीच्या किंवा ओळख नसलेल्या व्यक्तीकडून लिंक किंवा एखादी फाइल पाठवण्यात येत असते.
पूर्वी आधारकार्ड पॅनकार्डशी जोडण्यासाठी लिंक पाठवण्यात येत होती किंवा महावितरणचे बिल थकले आहे, अशी बतावणी करून फसवणूक करण्यात येत होती. यंदा आरटीओ चलन, वाहतूक पोलिसांचे चलन आले आहे, अशीही कारणे समोर आली आहेत. नागरिकांनी अशा लिंक किंवा फाइल ओपन करू नये, असे आवाहन पोलिसातर्फे केले जात असले, तरीदेखील लोक अशा गोष्टींना बळी पडत असतात. या संदर्भात मायक्रोसॉफ्टसोबत महाराष्ट्र सरकारने सायबरक्षेत्राचे सहकार्य केले आहे. त्याचा गुन्हे तातडीने शोधण्यासाठी उपयोग होऊ शकेल.
ब्रुकफिल्डचे केंद्र पवईत होणार असून, मुंबईत सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. गेल्या मे महिन्यात ब्रुकफिल्ड कंपनीने, पुढील पाच वर्षांत भारतातील तिच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता तिप्पट करून, त्या 100 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते. मायक्रोसॉफ्टची ही गुंतवणूक ‘ब्रुकफिल्ड सेट मॅनेजमेंट’ या जगातील नामवंत कंपनीच्या भारतातील वाढत्या महत्त्वाकांक्षेशी सुसंगत आहे.
सामान्यतः जीसीसीमध्ये तंत्रज्ञान, संशोधन, विकास, आयटीसेवा आणि डेटा विश्लेषण यासारखी कामे केली जातात. महाराष्ट्र जगातील 28व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. वाहनांची निर्मिती व सुट्या भागांच्या क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा 13.60 टक्के वाटा आहे. परकीय गुंतवणुकीतही राज्य देशात अग्रस्थानी आहे. तर निर्यातीत गुजरातनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मुंबई महानगर प्रदेशाच्या अगदी केंद्रस्थानी असल्याने, तो संपूर्ण राज्यासाठी एक मॅग्नेट ठरत आहे.
येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात 400 जीसीसी उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली असून, यात पुणे शहराला प्रमुख केंद्र म्हणून प्रोत्साहन दिले जात आहे. भारतात जीसीसी चालवण्याचा कमी खर्च येतो, हे महत्त्वाचे असून, त्यामुळेच गुंतवणूक केली जात आहे. महाराष्ट्रात उच्चशिक्षितांची संख्या फोफावत असून, तरुण-तरुणींना यामुळे चांगला रोजगार मिळण्याची सुसंधी प्राप्त होणार आहे. एकूण, महाराष्ट्राचा चेहरा खर्या अर्थाने बदलतो आहे. मात्र पहिल्याच पावसात विकास उघडा पडला त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील पेपरफुटीसारखे प्रकार बंद होणे आवश्यक असून, शैक्षणिक दर्जाही वाढवला पाहिजे.






