लक्षवेधी : नवी दिशा, नवी समीकरणे
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह (Narendra Modi - Balen Shah) यांनी भारताला भेट दिली. या दौर्यामुळे भारत आणि नेपाळ यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

– अॅड. स्वप्निल श्रोत्री
Narendra Modi – Balen Shah : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह (Narendra Modi – Balen Shah) यांनी भारताला भेट दिली. या दौर्यामुळे भारत आणि नेपाळ यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह (Narendra Modi – Balen Shah) अर्थात बालेन शाह यांचा 22 आणि 23 नोव्हेंबर 2026 रोजी झालेला भारत दौरा दक्षिण आशियातील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे. नेपाळच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा.
बालेन शाह हे नेपाळच्या राजकारणातील एक वेगळे व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास आले आहेत. काठमांडूचे महापौर म्हणून काम करताना त्यांनी पारंपरिक राजकीय व्यवस्थेला आव्हान दिले. भ्रष्टाचार, प्रशासनातील दिरंगाई, नागरी समस्या आणि प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरोधातील त्यांची भूमिका यामुळे त्यांना तरुण वर्गाचा मोठा पाठिंबा मिळाला. अशा पार्श्वभूमीवर देशाचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्यांचा पहिलाच अधिकृत भारत दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतो.
संबंध दृढ करण्याचा प्रयत्न
भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध केवळ दोन देशांमधील राजनैतिक संबंध नाहीत. दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक नात्यांची घट्ट वीण आहे. भारत आणि नेपाळदरम्यान खुली सीमा असून नागरिकांना एकमेकांच्या देशात ये-जा करण्याची मुभा आहे. रोजगार, व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि धार्मिक यात्रांच्या माध्यमातून दोन्ही देशांचे नागरिक परस्परांशी जोडले गेले आहेत.
अयोध्या आणि जनकपूर, काशी आणि पशुपतिनाथ यांसारख्या धार्मिक-सांस्कृतिक संबंधांमुळे या मैत्रीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, इतके जवळचे संबंध असूनही गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद निर्माण झाले आहेत. सीमावाद, व्यापारातील असमतोल, वाहतूक व्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांमुळे परस्पर विश्वासाला काही प्रमाणात तडे गेले आहेत. या पार्श्वभूमीवर बालेन शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यात झालेली चर्चा महत्त्वाची ठरते. दोन्ही नेत्यांनी आर्थिक सहकार्य, ऊर्जा, जलसंपदा, संपर्क व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन आणि प्रादेशिक प्रश्नांवर चर्चा केली.
आठ सामंजस्य करार
या दौर्यात भारत आणि नेपाळदरम्यान आठ सामंजस्य करार करण्यात आले. अवकाश तंत्रज्ञान, उपग्रह दळणवळण, पोलीस प्रशिक्षण, प्रशासकीय अधिकार्यांचे प्रशिक्षण, आयुर्वेद आणि पारंपरिक वैद्यकीय पद्धती, आरोग्य, शाश्वत नागरी विकास तसेच पशुधन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्याचे निश्चित करण्यात आले.
याशिवाय नेपाळच्या परदेशी व्यापारासाठी गुजरातमधील दीनदयाळ बंदराचा नवा मार्ग उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली. भारत आणि नेपाळमधील विमान वाहतूक अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने काठमांडू-भैरहवा-लखनौ हवाई मार्ग दोन्ही दिशांनी सुरू करण्याबाबतही सहमती झाली. नेपाळमधील रासुवा-भोटेकोशी परिसरात आलेल्या भीषण पुरामुळे मोठे नुकसान झाले होते.
या आपत्तीनंतर भारताने दिलेल्या मदतीबद्दल बालेन शाह (Narendra Modi – Balen Shah) यांनी भारताचे आभार मानले. आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्बांधणीमध्ये दोन्ही देशांनी सहकार्य वाढविण्याची गरजही या दौर्यात अधोरेखित झाली.विशेष म्हणजे, दोन्ही देशांनी ‘विकसित भारत आणि समुन्नत नेपाळ’ या संयुक्त दूरदृष्टी दस्तऐवजाला मान्यता दिली. हा दस्तऐवज भविष्यातील आर्थिक, तांत्रिक आणि पायाभूत सहकार्याचा महत्त्वाचा आधार ठरू शकतो.
चीनचा वाढता प्रभाव व आव्हाने
बालेन शाह यांच्या भारत दौर्याचे महत्त्व केवळ द्विपक्षीय संबंधांपुरते मर्यादित नाही. दक्षिण आशियातील बदलती भू-राजकीय परिस्थिती आणि चीनचा वाढता प्रभाव यांचाही विचार करावा लागतो. नेपाळ हा भारत आणि चीन या दोन मोठ्या देशांच्या मध्ये असलेला भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा देश आहे. चीनने गेल्या काही वर्षांत नेपाळमध्ये पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, ऊर्जा आणि आर्थिक गुंतवणुकीच्या माध्यमातून आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.
चीनच्या ‘बेल्ट अँड रोड’ उपक्रमाच्या माध्यमातून नेपाळशी संबंध अधिक दृढ करण्याची त्यांची रणनीती आहे. भारतासाठी नेपाळचे भौगोलिक आणि सामरिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे नेपाळशी असलेले संबंध केवळ शेजारी देश म्हणून नव्हे, तर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक स्थैर्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहेत.
अनुत्तरित प्रश्नांकडे दुर्लक्ष नको
या दौर्यात सकारात्मक निर्णय झाले असले तरी भारत आणि नेपाळ यांच्यातील सर्व प्रश्न सुटलेले नाहीत. सीमावाद, व्यापारातील असमतोल, नेपाळच्या उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत अधिक संधी, पारगमन व्यवस्था आणि पंचेश्वर बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प यांसारखे प्रश्न अद्याप महत्त्वाचे आहेत.
नेपाळची भारतासोबतची व्यापारातील तूट हा तेथील राजकीय नेतृत्वासाठी चिंतेचा विषय आहे.
नेपाळला भारताकडून केवळ आर्थिक मदत नको, तर स्वतःच्या उत्पादनांना बाजारपेठ, गुंतवणुकीच्या संधी आणि आर्थिक स्वावलंबनासाठी अनुकूल वातावरणही अपेक्षित आहे. त्यामुळे भारताने नेपाळकडे केवळ मदत स्वीकारणारा देश म्हणून न पाहता समान भागीदार म्हणून पाहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नेपाळनेही भारताच्या सुरक्षाविषयक चिंता आणि परस्पर सहकार्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे.
नव्या पर्वाची सुरुवात होणार का?
बालेन शाह यांचा हा दौरा भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांसाठी परस्परविश्वास पुनर्स्थापित करण्याची संधी ठरू शकतो. केवळ करारांवर स्वाक्षर्या करून किंवा संयुक्त निवेदने प्रसिद्ध करून द्विपक्षीय संबंध मजबूत होत नसतात. त्या करारांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांना मिळणारे प्रत्यक्ष लाभ आणि एकमेकांच्या राष्ट्रीय हितांचा आदर या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात.
दक्षिण आशियातील शांतता, स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी भारत आणि नेपाळ यांच्यातील मैत्री अत्यंत महत्त्वाची आहे. बालेन शाह यांच्या भारत दौर्यातून त्याची पुन्हा एकदा जाणीव झाली आहे. आता या दौर्यात झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, यावर दोन्ही देशांच्या संबंधांचे (Narendra Modi – Balen Shah) भवितव्य अवलंबून असेल.






