मुंबई – बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता. मात्र आता त्याने सप्टेंबर महिन्याची तारीख दिली आहे, असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला आहे. रासपचा 16वा वर्धापन सोहळा मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी जानकरांनी ही माहिती दिली.
महादेव जानकर म्हणाले, दुबईतून ज्यांनी बाईट दिला, ते आमचे बिग बॉस, बिग ब्रदर संजय दत्त यांची 25 ऑगस्टची तारीख घेतली होती. मात्र, त्यांनी सप्टेंबरची तारीख घेतली आहे. नाहीतर ते आजच पक्षात जाहीर प्रवेश करणार होते. तुम्ही सांगाल त्या आमदाराच्या आणि रासपच्या प्रचाराला संजय दत्त स्वतः येणार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, संजय दत्तचे वडील दिवंगत अभिनेते सुनील दत्त कॉंग्रेस पक्षात होते. खासदार आणि क्रीडामंत्री म्हणून त्यांनी कॉंग्रेसमध्ये काम पाहिले आहे. संजय दत्तची बहीण प्रिया दत्तही मुंबईमधून खासदार म्हणून निवडून आली होती आणि यावेळीही कॉंग्रेसने प्रिया दत्त यांना उमेदवारी दिली होती. संजय दत्त यांची आई नर्गिस दत्तही 1980 मध्ये राज्यसभेत नॉमिनेट झाल्या होत्या.
संजय दत्तनेही 2009 मध्ये समाजवादी पार्टीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुंबईच्या बॉम्ब हल्ल्यामध्ये संजय दत्तचं नाव आल्यामुळे त्याला निवडणूक लढवता आली नव्हती.