लॉक डाऊन वाढणार!

नवी दिल्ली : देशातील लॉक डाऊन उठवण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील विरोधी पक्षांच्या गटनेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा बोलताना स्पष्ट शब्दात फेटाळून लावली. त्याचवेळी यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. मात्र अद्याप करोनावर नियंत्रण मिळवणाऱ्या देशांत भारताचा समावेश असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
आपल्या नागरिकांना वाचवण्याचा लॉकडाऊन हाच एकमेव मार्ग आहे, असे स्पष्ट करून मोदी म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांच्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि तज्ज्ञांच्या नियमित संपर्कात आहे. त्यातील कोणीही मला लॉक डाऊन उठवण्याची विनंती केली नाही. सोशल डिस्टन्सिंग सांभाळण्यासाठी आपल्याला कडक कायद्याची गरज आहे. आपल्याला काही अनपेक्षित पावलेही उचलावी लागतील.
लॉक डाऊन उठवण्याचा विषयही कोणी काढत नाही, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांशी पुन्हा चर्चा करेन. पण सध्याच्या स्थितीत संपूर्ण लॉकडाऊन उठवणे शक्य नाही. याबाबत आम्ही जिल्हा पातळीवरही संवाद साधत आहोत, असेही ते म्हणाले.
या बैठकीच्या सकारात्मक प्रतिसादाचा गौरव करत ते म्हणाले, यामुळे या जागतिक साथी विरोधात आपण यशस्वीपणे लढू शकू. ही चर्चा यशस्वी झाली, असेही त्यांनी नमूद केले. या लढ्यात सामुदायिक प्रयत्न ही आवश्यक गरज आहे, राजकीय पक्ष, राज्य सरकार आणि देशवासीयांच्या सहकार्याने या लढ्यात देश विजय मिळवू शकतो, असेही ते म्हणाले.
करोना विरोधातील लढ्यातील धोरणही मोदी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, प्राप्त परिस्थितीत आपण उपलब्ध संसाधनांचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. या काळात सरकार शक्य तेवढ्या अधिकाधिक लोकांशी संवाद साधत आहे. मी मुख्यंत्र्यांशी नियमितपणे संवाद साधत आहे. मी त्यांच्या सूचना स्वीकारत आहे. या शिवाय समाजातील अन्य लोकांशीही मी चर्चा करत आहे.
या पेचप्रसंगात राजकीय मतभेद विसरून दाखवत असलेल्या अभूतपूर्व ऐक्याचा गौरव करून पंतप्रधान म्हणाले, मी राज्य सरकारांचे पुन्हा एकदा आभार मानू इच्छितो. गरजा लक्षात ठेवून केंद्र आणि राज्य एकत्रित काम करत आहेत. त्यामुळेच कोणतेही पूर्वग्रह मनात न ठेवता एकत्रित काम करणे शक्य होत आहे.
या संवादात राज्य सभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा समावेश होता. आरोग्य, गृह आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी या नेत्यांना केलेल्या उपाय योजनांबद्दल माहिती दिली. त्याचवेळी लॉक डाऊनमुळे निर्माण होणारे अडथळे या नेत्यांच्या कानावर घातले. अनेक नेत्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना भेडसवणाऱ्या व्यक्तीगत सुरक्षा साधनांच्या (पीपीई) तुटवड्याबाबत चिंता व्यक्त केली. तर अनेक नेत्यांनी नव्या संसदेचे काम थांबवावे, असे सुचवले, असे सूत्रांनी सांगितले.
देशातील लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिलनंतर वाढवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक राज्यांनी त्याला पाठींबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्व आले आहे. आझाद आणि पवार यांच्याशिवाय समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, बहुजन समाज पक्षाचे सतिश मिश्रा, लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पास्वान, डीएमकेचे टी. आर. बबलू, शिरोमणी अकली दलाचे सुखबिरसिंग बादल, जनता दल संयुक्तचे राजीव नंदन सिंह, बिजू जनता दलाचे पिनाकी मिश्रा आणि शिवसेनेचे संजय राऊत यांचा समावेश होता. सुरवातीला विरोध करणाऱ्या तृणमूल कॉंग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय या चर्चेत सहभागी झाले होते.





