रूपगंध: बेदाण्याची वही

रात्रीचे साडेदहा वाजले तरी तेजस रोजच्या सवयीप्रमाणे डायरी लिहीत असल्याचे पाहून आई त्याला म्हणते अरे, तेजस पुढच्या वर्षी दहावी आहे. आताही डायरी लिहायचं थांबव पाहू. तेजसः ए आई झालेच गं… बंद कशाला करायचं, अगदी पाच मिनिटांत तर लिहून होते. आणि प्लीज डायरी म्हणून याचा अपमान नको करूस ही माझी लाडकी ‘बेदाण्याची वही’ आहे. आई ः ‘हो माहितीये मला तुला बेदाणे किती आवडतात ते. तू लहान असताना दिवाळीतल्या फराळातले सगळ्या लाडवांवरचे बेदाणे गुपचूप खायचास.’
तेजस ः ते तर मला अजूनही आवडतातच पण या बेदाण्याच्या वहीतल्या गोष्टी पुन्हा वाचायलाही जाम मजा येते. आता बघ कधी कधी तू माझ्यावर खूप ओरडतेस तेव्हा मला तुझा खूप राग येतो पण अशावेळी मी उघडून त्यात तू आणि मी याआधी किती मजा केली आहे आणि तू ओरडल्यामुळेच मला किती छान मार्क्स मिळाले होते हे वाचल्यावर माझा राग एका मिनिटात उडून जातो.
आई ः बरं पुरे झालं आता. उगाच मस्का नको मारूस. झोप आता उशीर झालाय. उद्या शाळेत जायचंय ना.
तेजस ः हो तर, उद्या मला प्रोजेक्ट पण सबमिट करायचा आहे. तसही मला उगाच शाळा बुडवायला बिलकुल आवडत नाही.
दुसर्या दिवशी शाळेतून घरी आल्यावर तेजस नेहमीप्रमाणे आईला आज शाळेत काय काय झालं याबद्दल सांगू लागतो. ‘आई, आज ना अर्णवला शाळेत पुन्हा चक्कर आली.’
‘अरे बापरे, ह्या महिन्यात जवळपास चौथ्यांदा त्याला असं झालं असेल. आणि ती मिहिका कशी आहे रे आता? गेल्या महिन्यात तिलापण अशीच चक्कर यायची ना. हे जंकफूड आणि मोबाइल यांनी मुलांना फारच कमकुवत करून टाकलंय.’
अभ्यास, ग्राउंड, जेवण आटपून तेजस रात्री पुन्हा वही लिहायला बसतो. अर्णवबद्दल लिहून झाल्यावर तो सहजच वही चाळू लागतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की शाळेतली बरीच मुलं हल्ली अचानक चक्कर आल्यामुळे सुट्टी घेत आहेत. मगाचचे आईचे शब्द रात्रभर त्याच्या कानात घुमत राहतात. आपल्या मित्रांचं असं अचानक आजारी पडण्याचं, अभ्यासात मागे पडण्याचं कारण आपण शोधून काढलंच पाहिजे, असा तो मनोमन निश्चय करून झोपी जातो.
दोन दिवसांनी शाळेत जाताना त्याला शाळेच्या अगदी जवळच एक वडापावची गाडी आणि त्याच्याभोवती बरीच मुलं गर्दी करून उभी राहिलेली आढळतात. हा वडापाव खाल्ल्यामुळे तर आपले मित्र आजारी पडत असतील का? अशी शंका त्याच्या मनात येते. म्हणून पुढे दहा-बारा दिवस तो जाता येता त्या वडापाव वाल्याकडे त्याच्या नकळत बारीक लक्ष ठेवू लागतो.
तेव्हा त्याला कळतं की हा वडापाव सोबत काहीतरी काही ठराविक मुलांना कुठली तरी गोळी पण देतोय आणि हीच मुलं पुढे काही दिवसांत आजारी पण पडत आहेत. तो अशा मुलांसोबत मैत्री करून त्यांच्याकडून त्या गोळी विषयी माहिती मिळवतो. बर्याच मित्र-मैत्रिणींकडून त्याला समजतं की ही गोळी खाल्ली की अभ्यासाचं टेन्शन निघून जातं.
म्हणून ही गोळी त्यांना घ्यायला आवडते. काहीजण तर घरात मनातलं शेअर करायला कोणी नसल्यामुळे ही गोळी घेतात, त्यामुळे त्यांना मोकळं झाल्यासारखं वाटतं. या गोळीत नक्की असं काय दडलंय या उत्सुकतेपोटी तो गोळीविषयी गूगलबाबाकडून अजून माहिती मिळवतो. तेव्हा त्याला कळतं की ही गोळी कुठलीतरी साधीसुधी गोळी नसून एकप्रकारचे ड्रग्स आहेत.
याने होणार्या दुष्परिणामांची यादी पाहून त्याला धक्काच बसतो. तो हा सगळा प्रकार त्याच्या आईबाबांना सांगतो. आपण मिळवलेली माहिती ही नक्की बरोबर आहे ना याची खात्री देखील करून घेतो. सुरुवातीला आई अभ्यास सोडून हे सगळं केल्याबद्दल त्याला ओरडते. पण हे सगळं करण्यामागचा त्याचा हेतू कळाल्यावरती त्याला मदत करायचं ठरवते. बाबा देखील तेजसला याबद्दलची अजून माहिती मिळवण्यासाठी मदत करतात.
काही दिवसांनी त्याची आई शाळेत येऊन हे सर्व काही मुख्याध्यापकांना सांगते व सोबत बेदाण्याच्या वहीचा पुरावापण दाखवते. शाळेतील विद्यार्थ्यांचे अटेंडन्स बुक तपासल्यावर शिक्षकांचा तेजसच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असावे यावर विश्वास बसतो. मग मुख्याध्यपक काही शिक्षकांना व तेजसला या सर्व प्रकरणाचा शोध घेण्यासाठी एका मोहिमेवर पाचारण करते. लगेचच शाळेतील शिक्षक तेजसच्या मदतीने अशा मुलांची नावे लिहून त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून घेतात.
शिक्षकांच्या सांगण्यानुसार पालकही काही दिवस आपल्या मुला/मुलीच्या नकळत त्यांच्यावर काटेकोर लक्ष ठेवतात. बर्याच मुलांच्या दप्तरांमध्ये ही गोळी सापडते. परंतु मुलांकडे या याबाबत चौकशी केल्यावर ते त्याबद्दल सांगायला घाबरतात. पण मग तेजस त्यांच्याशी बोलून त्यांची भीती दूर करून ही गोळी किती घातक आहे, त्यामुळे आजपर्यंत किती मुलांना काय काय त्रास झाला आहे, आपल्या मित्रांना आपणच यातून वाचवायला हवे आणि ही गोळी देणार्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे हे त्यांना समजावून सांगतो.
तेव्हा कुठेही मुले, तो वडापाववाला जी मुले त्याच्याकडून खूप वेळा वडापाव विकत घेतात त्यांना ही गोळी तो पहिले दोन-तीन वेळा फुकट देतो आणि मग नंतर आम्हाला या गोळीची आवड लागल्यावर तो आम्हाला ही गोळी दहा रुपयात देतो असं सगळं सत्य समोर आणतात. ‘आता आम्हाला आमची चूक कळली आहे परत कधीही आम्ही असं काहीही करणार नाही’ असं कबूलही करतात.
मुख्याध्यापक या सर्व प्रकरणाची पोलिसांकडे नोंद करतात.पुरावा हाती लागताच पोलीस देखील ताबडतोब त्या वडापाव वाल्याला त्याच्या गंभीर आरोपासाठी अटक करतात.हे सगळं काही तेजसच्या बेदाण्याच्या वहीमुळे शक्य झालं असं कळल्यावर पोलीसही छोट्याशा तेजसचे आभार मानतात. आपल्या मुलांची व आपल्या विद्यार्थ्यांची ड्रग्सच्या भयानक जाळ्यातून अत्यंत चतुराईने सुटका करून दिल्याबद्दल त्यांचे पालक व शाळेतील मुख्याध्यापक तेजसचे आभार मानून कौतुकही करतात.
पण सगळ्यांनाच तेजसच्या वहीचं नाव इतकं वेगळं का आहे याचं आश्चर्य वाटतं. मग तेजस त्यांना सांगतो, ‘आपल्या सगळ्यांनाच लाडवामधला बेदाणा हा आकाराने फारच लहान असून देखील लाडवापेक्षाही जास्त आवडतो तसंच दिवसभरातल्या सर्व आंबट गोड गोष्टी मी यावेळी अगदी थोडक्यात म्हणजे दोन ओळीतच लिहितो. मग नंतर कधीतरी या गोष्टी वाचून त्या वेळच्या गमती जमती आठवायला फार भारी वाटतं म्हणून मी हिला ‘बेदाण्याची वही’ असं नाव दिलंय.’ आई-बाबांना देखील आपल्या मुलाच्या हुशारीचं फार कौतुक वाटतं आणि म्हणून ते त्याला अजून एक ‘बेदाण्याची वही’ गिफ्ट देतात.
– स्नेहल बाकरे





