Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांविरोधातील सुनावणी पुढे ढकलली; SIR याचिकांवर ‘या’ तारखेला सुनावणी
Gyanesh Kumar : आयोगास ४८ प्रश्न विचारण्यासाठी विरोधी पक्षांचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

Gyanesh Kumar : देशभरातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीत (एसआयआर) मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आणि त्यात अनियमितता झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आता ९ डिसेंबर रोजी सुनावणी घेणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह ‘इंडिया’ आघाडीतील इतर नेत्यांनी या याचिका दाखल केल्या आहेत.
सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी या याचिकांवर सुनावणी होणार होती. मात्र, दुपारच्या सत्रात यापूर्वी अर्धवट राहिलेल्या एका प्रकरणावर सुनावणी होणार असल्याने आणि दुपारी साडेतीन वाजता एका विशेष खंडपीठाचे कामकाज चालणार असल्याने न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली. (Gyanesh Kumar)
सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, देशव्यापी फेरतपासणीच्या निर्णयप्रक्रियेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला ४८ लेखी प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी, यासाठी राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी अर्ज दाखल केला आहे. यावर उत्तर देण्यासाठी आयोगाला अवधी मिळू शकेल, असे सिब्बल म्हणाले. त्यावर, पुढील तारखेला या अर्जावरही सुनावणी घेऊन निर्णय घेतला जाईल, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. (Gyanesh Kumar)
आयोगाने आरोप फेटाळले (Gyanesh Kumar)
निवडणूक आयोगाने २६ ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या २४८ पानी प्रतिज्ञापत्रात फेरतपासणीचे समर्थन करत सर्व आरोप फेटाळले आहेत. मतदार नोंदणीसाठीच्या ‘फॉर्म ६’ मध्ये कोणताही बदल केलेला नसून, हे सर्व निर्णय तिन्ही आयुक्तांच्या एकमतानेच घेतल्याचे उप निवडणूक आयुक्त भानू प्रकाश येतुरू यांनी स्पष्ट केले आहे.
आयोगावर असे आरोप करणे दुर्दैवी असल्याचेही त्यात म्हटले आहे. मात्र, आयोगाचे हे प्रतिज्ञापत्र केवळ पोकळ दाव्यांवर आधारलेले असून, त्यात कोणत्याही निर्णयाचा किंवा फाईलचा ठोस उल्लेख नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
हेही वाचा:





