India Summit 2026: ‘व्होट चोर, गद्दी छोड’ इटलीतील नेत्याच्या घोषणेनंतर भाजपने साधला राहुल गांधींवर निशाणा
India Summit 2026: "जेव्हा एखादा परदेशी नागरिक भारताचा अपमान करतो, तेव्हा कुणाला हसताना बघितले आहे का?"

India Summit 2026: हैदराबाद येथे पार पडलेल्या ‘भारत समिट २०२६’ परिषदेत इटलीचे नेते जियाकोमो फिलिबेक यांनी काँग्रेसची ‘व्होट चोर, गद्दी छोड’ ही घोषणा दिली होती. त्यांच्या या घोषणेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी टाळ्या वाजवत हसताना दिसून आले. यावरून भाजपने काँग्रेसवर भारत विरोधी आणि भारताचा अपमान करत असल्याचा आरोप केला आहे.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले, “जेव्हा एखादा परदेशी नागरिक भारताचा अपमान करतो, तेव्हा कुणाला हसताना बघितले आहे का? मी हे विचारत नाहीये की, कोणता भारतीय परदेशात जाऊन भारताचा अपमान करतो.”
Have you ever seen anyone laughing when India is insulted by a foreigner? I’m not asking about which Indian goes abroad to insult India.
— Kiren Rijiju (@KirenRijiju) November 15, 2026
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रदीप भंडारी यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “राहुल गांधी आता परदेशी शक्तींचे आणि जॉर्ज सोरोसच्या हातातील बाहुले बनले आहेत. ते देशात अस्थिरता निर्माण करून परदेशी मदतीने सत्ता बदल घडवू पाहत आहेत.”
इटालियन नेते जियाकोमो फिलिबेक नेमके काय म्हणाले?
‘पार्टी ऑफ युरोपियन सोशलिस्ट’चे सरचिटणीस जियाकोमो फिलिबेक यांनी भारत समिटमध्ये बोलताना मतदार याद्यांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात राहुल गांधींनी उभारलेल्या मोहिमेचे कौतुक केले. भारतात लोकशाहीवर हल्ला होत असून, तिचे रक्षण करण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असल्याचेही फिलिबेक यांनी सांगितले.
“प्रत्येक लोकशाहीचा पाया असलेल्या ‘एक व्यक्ती, एक मत’ या तत्त्वाचे राहुल गांधींनी रक्षण केले आहे. पारदर्शक मतदार याद्यांसाठी त्यांनी सुरू केलेली मोहीम आणि दिल्लीतील रामलीला मैदानावर त्यांच्यासोबत जमलेला हजारो नागरिकांचा जनसमुदाय लोकशाही सहज मिळत नाही, तर त्यासाठी उभे राहावे लागते हे हेच दर्शवतो ,” असे फिलिबेक म्हणाले. यानंतर त्यांनी हिंदीत ‘व्होट चोर, गद्दी छोड’ अशी घोषणा दिली होती.
संजय राऊत यांची भाजपावर टीका
भाजपच्या या टीकेला शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “जर पंतप्रधान मोदी इटलीच्या पंतप्रधानांना ( जॉर्जिया मेलोनी) चॉकलेट देऊ शकतात, तर इटलीचा एखादा नेता भारतात येऊन देशाबद्दल का बोलू शकत नाही? देशात लोकशाहीची हत्या होत आहे. हा कोणत्याही परदेशी सत्तेचा हस्तक्षेप नसून संयुक्त राष्ट्रे आणि मानवी हक्कांशी संबंधित विषय आहे,” असे राऊत यांनी म्हटले.
हेही वाचा:
Shraddha Kapoor: कधी फ्लोरल ड्रेस, तर कधी पिंक ब्लेझर; श्रद्धा कपूरचा स्टायलिश अंदाज चर्चेत!





