Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये चीनने पाकिस्तानला केली मदत; संसदेत चर्चेची कॉंग्रेसची मागणी
ऑपरेशन सिंदूर दरम्यान चीनने पाकिस्तानला तांत्रिक मदत पुरवल्याच्या दाव्यावरून आता देशातील राजकारण तापले आहे.

Operation Sindoor – ऑपरेशन सिंदूर दरम्यान चीनने पाकिस्तानला तांत्रिक मदत पुरवल्याच्या दाव्यावरून आता देशातील राजकारण तापले आहे. काँग्रेसने या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला घेरले असून, या विषयावर संसदेत सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत सरकारला धारेवर धरले. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी अलीकडेच एका चिनी इंजिनिअरची मुलाखत प्रसारित केली.
यामध्ये गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या चार दिवसांच्या संघर्षात (ऑपरेशन सिंदूर) चीनने पाकिस्तानी हवाई दलाला ऑन-साइट तांत्रिक मदत केल्याचे मान्य केले आहे.
पाकिस्तान वापरत असलेल्या चिनी बनावटीच्या विमानांच्या देखभालीसाठी आणि युद्धनीतीसाठी चीनचे तज्ज्ञ प्रत्यक्ष युद्धभूमीवर उपस्थित होते, असे यातून स्पष्ट झाले आहे.
यावरूनच जयराम रमेश यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करताना चार प्रश्न विचारले आहेत. पंतप्रधान मोदींनी २०२० मध्ये चीनला क्लीन चिट देऊन भारताची वाटाघाटींची बाजू कमकुवत का केली?

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये चीनने पाकिस्तानला केली मदत; संसदेत चर्चेची कॉंग्रेसची मागणी
लडाखमधील भारताचे पारंपरिक गस्त घालण्याचे अधिकार सरकारने का गमावले? ऑपरेशन सिंदूरमध्ये चीनने उघडपणे पाकिस्तानची साथ देऊनही भारत सरकारने साधी प्रतिक्रिया का दिली नाही?
चीनवरील व्यापार निर्बंध शिथिल करून सरकार भारताचे औद्योगिक अवलंबित्व चीनवर का वाढवत आहे असे सवाल जयराम रमेश यांनी डागले आहेत.
मोदी सरकार चीनसमोर सतत शरणागती पत्करत आहे, असा आरोप करत रमेश यांनी सरकारला चीनसोबतच्या वाढत्या व्यापारावरून जाब विचारला. जुलै २०२५ मध्ये लष्कराच्या उपप्रमुखांनी चीनच्या या भूमिकेबद्दल संकेत दिले होते,
तरीही सरकार गप्प का आहे, असा सवाल काँग्रेसने केला आहे. भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या या गंभीर मुद्द्यावर सरकारने संसदेत मौन सोडावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.





