Air India News : एअर इंडियाकडून तीन वर्षांत १,००० हून अधिक कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
एअर इंडियाने गेल्या तीन वर्षांत नैतिकतेचे उल्लंघन आणि गैरवर्तणुकीच्या आरोपाखाली १,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केली आहे.

Air India News :- एअर इंडियाने गेल्या तीन वर्षांत नैतिकतेचे उल्लंघन आणि गैरवर्तणुकीच्या आरोपाखाली १,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केली आहे. एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी कर्मचाऱ्यांच्या टाऊन हॉल सभेत ही माहिती दिली.
विमानातून वस्तूंची तस्करी करणे, प्रवाशांकडून जादा सामानाचे शुल्क न आकारता त्यांना परवानगी देणे आणि कर्मचारी सवलत प्रवास योजनेचा गैरवापर करणे यांसारख्या गंभीर कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या एअर इंडिया समूहाला मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात २२,००० कोटी रुपयांहून अधिक तोटा होण्याची शक्यता आहे.कोणी पाहत नसतानाही कर्मचाऱ्यांनी योग्य मार्गाने वागले पाहिजे, असे विल्सन यांनी स्पष्ट केले.
मध्यपूर्वेतील तणावाच्या परिस्थितीमुळे आगामी वर्ष अत्यंत कठीण जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.कंपनीने वार्षिक पगारवाढ रोखण्यासह इतर अनावश्यक खर्च कमी करण्यास सुरुवात केली असून कर्मचाऱ्यांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियामध्ये सध्या सुमारे २४,००० कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीने शिस्तभंगाच्या विरोधात कडक पावले उचलत ४,००० हून अधिक कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील सुरू केली आहे.





