Rohit Pawar : आंदोलनामागे सामाजिक विचार; पक्ष चिन्ह न वापरण्याबाबत रोहित पवारांचे स्पष्टीकरण
राष्ट्रवादी(शप) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे पक्षापासून वेगळी भूमिका मांडत असल्याची चर्चा आहे. आंदोलन करताना ते पक्षाचे नाव, चिन्ह किंवा पक्षाचा झेंडा का वापरणार नाहीत?, असा प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला, त्यावर रोहित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Rohit Pawar : राष्ट्रवादी(शप) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे पक्षापासून वेगळी भूमिका मांडत असल्याची चर्चा आहे. आंदोलन करताना ते पक्षाचे नाव, चिन्ह किंवा पक्षाचा झेंडा का वापरणार नाहीत?, असा प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला, त्यावर रोहित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटले की, आम्ही कोणतेही आंदोलन करताना सामाजिक विचार ठेऊन ते आंदोलन करतो. त्यामुळे पक्षाचे चिन्ह किंवा नाव वापरत नाही. पुण्यामध्ये एमपीएससीचे आंदोलन हे विद्यार्थ्यांचे होते. तिथे आपण चिन्ह वापरले नव्हते. पंढरपुरातील शेतकऱ्यांच्या आंदोलनातही पक्षाचे चिन्ह वापरले नव्हते, कारण हे विषय मोठे होते आणि त्यामध्ये राजकारण येऊ नये, असा आमचा प्रयत्न होता.
अशा आंदोलनामध्ये जर पक्षाचे चिन्ह आले तर त्या आंदोलनाला राजकीय भूमिका आहे असे काहीजण म्हणू शकतात. त्यामुळे नागपूरच्या ट्रॅक्टर मोर्चामध्येही आम्ही पक्षाचे चिन्ह वापरणार नाही, असे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी(शप) ते अध्यक्ष शरद पवार यांनी ज्या मुद्द्यांवरून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे, त्या 13 मुद्द्यांवरून आम्ही येत्या 4 डिसेंबर रोजी शेगावपासून ट्रॅक्टर मोर्चा काढणार असून तो 9 डिसेंबर रोजी नागपुरात पोहोचणार आहे, असे रोहित पवार म्हणाले.
आंदोलनाला पक्षाचा विरोध नाही
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार (Rohit Pawar) हे एकाकी संघर्ष करताना दिसत असून पक्षातून त्यांना विरोध असल्याच्या चर्चा आहेत. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून आणि विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून रोहित पवारांची भूमिका ही पक्षाच्या विरोधात असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
रोहित पवारांना स्वतंत्र आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र जर पक्षाचे चिन्ह आणि झेंडा वापरला तर त्याला व्यापक स्वरुप प्राप्त होईल. मात्र त्यासाठी पक्षांतर्गत चर्चा होणे गरजेचे आहे, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मांडली. रोहित पवारांच्या आंदोलनाला पक्षातून विरोध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.






