Vivekanand Patil : विवेकानंद पाटलांना राजकीय पक्षांचे बोलावणे; दिली सर्वात मोठी ऑफर !
आधुनिक महाराष्ट्र जर घडवायचा असेल आणि सुसंस्कृत भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर मला पण तरुणच सगळ्यात पहिल्यांदा केंद्रस्थानी वाटतात.

Vivekanand Patil – पुण्यातील एमपीएससी आंदोलनातून चर्चेत आलेले विद्यार्थी विवेकानंद पाटील यांना अनेक पक्षांकडून प्रवक्तेपदासाठी ऑफर्स आल्या होत्या, मात्र कुणी लाखो रुपये दिले तरी कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता होणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
मला राजकारणात जाण्याचे कोणतेही वेध लागलेले नाहीत. मला जे काही करायचे आहे, ते स्वतःच्या हिमतीवर रस्त्यावर उतरूनच करायचे आहे. एमपीएससी आंदोलन सध्या स्थगित केले असून, शासनाने मागण्यांबाबत चुकीची पावले उचलल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशाराही पाटील यांनी दिला.
दिल्लीतील आंदोलनाबाबत पाटील म्हणाले, कोणत्याही लढ्याला पहिल्याच दिवशी यश मिळत नाही. आम्ही ११ दिवस आंदोलन केले, तेव्हा थोड्याफार प्रमाणात यश मिळाले. अजूनही अध्यक्षांचा राजीनामा झालेला नाही. आम्ही संविधानाच्या मार्गाने लढत आहोत.
दिल्लीतील आंदोलकांच्या मागण्या आणि आमच्या मागण्या वेगळ्या आहेत. दोन्ही लढ्यांची तात्त्विक बैठकही वेगळी आहे. सध्या आमचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे, तर त्यांचे देशपातळीवर आहे. तरीही दिल्लीतील आंदोलकांना आमच्या पूर्ण शुभेच्छा आहेत, असे ते म्हणाले.
जळगावमध्ये माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, हा, मला आवडले हे की, मी लढताना विद्यार्थ्यांसमोर लढलो आणि येताना त्याच्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या समोरच आलो. आधुनिक महाराष्ट्र जर घडवायचा असेल आणि सुसंस्कृत भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर मला पण तरुणच सगळ्यात पहिल्यांदा केंद्रस्थानी वाटतात.
त्यामुळे तरुणांना जितके भेटून मार्गदर्शन करता येईल आणि त्यांच्यासाठी योग्य काहीतरी करता येईल, तर मी तितके ते करण्याचा प्रयत्न करेन, असेही पाटील यांनी म्हटले.





