Shivsena UBT : उद्धव ठाकरे गटाला मोठे खिंडार; अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ
Shivsena UBT : भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये युवासेना पालघर जिल्हाप्रमुख सिद्धेश जोगळे यांच्यासह वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २९ मधील उमेदवार सोनल रवींद्र जोगळे, पेल्हार विभागप्रमुख दिलीप कुवेसकर,

Shivsena UBT : वसई-विरार शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून युवासेनेचे पालघर जिल्हाप्रमुख सिद्धेश रवींद्र जोगळे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सलग ४४ वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले ज्येष्ठ शाखाप्रमुख प्रभाकर गोपाळ पाटील यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतल्याने ठाकरे गटाच्या संघटनात्मक रचनेला मोठे खिंडार पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजप प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा –
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. हेमंत सवरा, भाजप प्रदेश महामंत्री सुनील राणे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, नगरसेवक गणेश पाटील, विनीत तिवारी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
नुकत्याच पार पडलेल्या वसई-विरार महापालिका निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली नसली, तरी ४४ जागांवर विजय मिळवत पक्षाने महत्त्वपूर्ण यश संपादन केले होते. त्यानंतर संघटना अधिक मजबूत करण्यासाठी भाजपने विविध पक्षांतील नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षात सामावून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
हेही वाचा – रेशन वितरणाबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, तीन महत्त्वपूर्ण बदल
यांनी केला भाजपात प्रवेश –
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये युवासेना पालघर जिल्हाप्रमुख सिद्धेश जोगळे यांच्यासह वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २९ मधील उमेदवार सोनल रवींद्र जोगळे, पेल्हार विभागप्रमुख दिलीप कुवेसकर, वसई जमादार आळी विभागप्रमुख मनीष गायकवाड, उपविभागप्रमुख जितेश पवार, युवासेना शाखा अधिकारी (पापडी) आसिफ पठाण, शैलेंद्र गोलवणकर तसेच शेकडो कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश आहे.
विशेष म्हणजे प्रभाकर गोपाळ पाटील हे १९८२ पासून गावराईपाडा शाखेचे शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होते. तब्बल ४४ वर्षांच्या पक्षनिष्ठेनंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.





