Maharashtra Rain Alert : उन्हाच्या तडाख्यात पावसाची हजेरी.! राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
एकीकडे उन्हाचा चटका वाढत असतानाच, दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धास्ती वाढवली आहे.

Maharashtra Rain Alert – देशासह राज्यात सध्या हवामानाची दोन टोकाची रूपं पाहायला मिळत आहेत. एकीकडे उन्हाचा चटका वाढत असतानाच, दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धास्ती वाढवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, राज्यावर सध्या चक्रीवादळसदृश्य स्थिती निर्माण झाली असून पुढील ३ दिवस पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाला आहे. तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे.
यामुळे पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होऊ शकते. यामुळे उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळेल. मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
दरम्यान, विदर्भातील अमरावती आणि वर्धा या भागात उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती कायम राहण्याची शक्यत आहे. एकीकडे अवकाळीचा तडाखा बसत असतानाच दुसरीकडे मान्सूनबाबत चिंतेची बातमी आहे.
प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती निर्माण होत असल्याचा अंदाज हवामान संस्थांनी वर्तवला आहे. यामुळे यंदा देशात आणि राज्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.





