Legislative Council Election : आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजप 4 जागा लढवणार; पक्षाची निवडणूकीची रणनीती ठरली
पुढील महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीतील (Legislative Council Election) नऊ जागांपैकी चार जागांवर भाजप उमेदवार देणार आहे.

Legislative Council Election : पुढील महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीतील (Legislative Council Election) नऊ जागांपैकी चार जागांवर भाजप उमेदवार देणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या राज्य कोअर कमिटीची बैठक बुधवारी पार पडली.
या बैठकीत निवडणुकीची रणनीती, तसेच काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. भाजप नऊ जागांपैकी चार जागा लढवेल आणि पोटनिवडणुकीसाठीही आपला उमेदवार उभा करेल.
संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यात आली असून, निवडक नावांची यादी अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली जाईल, अशी माहिती देण्यात आली.
दरम्यान, विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता सत्ताधारी महायुती १० पैकी नऊ जागा, तर मविआ केवळ एक जागा जिंकण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत एखादी जागा जिंकण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा २९ निश्चित करण्यात आला आहे, तर पोटनिवडणुकीसाठी १४४ मतांची आवश्यकता असेल. जर बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांतून नव्याने निवडून आलेले सदस्य मतदानासाठी पात्र ठरले, तर पोटनिवडणुकीच्या जागेसाठी आवश्यक मतांचा कोटा वाढून १४५ होऊ शकतो.
निवडणूक कार्यक्रमानुसार, २३ एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल आहे. अर्जांची छाननी २ मे रोजी होईल आणि उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ४ मे असणार आहे.






