Dr. Amol Kolhe : “पक्षांतराची एखादी ऑफर आली तर विचार करू…”; डॉ. अमोल कोल्हे यांचं सर्वात मोठं विधान
आजपर्यंत मला कोणत्याही पक्षाकडून पक्षांतराची ऑफर आलेली नाही. भविष्यात अशी कोणती ऑफर आली, तर त्यावेळी त्यावर विचार करू." त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी उधाण आले आहे.

Dr. Amol Kolhe : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही खासदारांनी बंड केल्यानंतर आता शरद पवार गटातील खासदारांबाबतही विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
अशा वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खुलेपणाने कौतुक करत, “आजपर्यंत कोणतीही ऑफर आलेली नाही; पण भविष्यात एखादी ऑफर आली तर त्याबाबत विचार करू,” असे वक्तव्य केले. मात्र, त्याचवेळी त्यांनी शरद पवारांप्रती आपली निष्ठाही स्पष्टपणे व्यक्त केली आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना विरोधी पक्षातील अनेक नेते सत्ताधारी पक्षाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस मधील काही खासदारही पक्षांतर करू शकतात, असे दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली.
कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक करताना सांगितले की, “दिल्लीत अनेक नेत्यांची वेगवेगळ्या दृष्टीने चर्चा होत असते. एखाद्या मराठी नेत्याचे नाव ‘इन्फ्रा मॅन’ म्हणून घेतले जात असेल, तर ती महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
जसे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव देशभर आदराने घेतले जाते, तसेच देवेंद्र फडणवीस यांचेही नाव पायाभूत सुविधांच्या विकासासाठी घेतले जात असेल, तर त्यात चुकीचे काहीच नाही. राजकीय भूमिका बाजूला ठेवून महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी म्हणून मी ही भावना व्यक्त करतो.”
याचवेळी पक्षांतराच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी स्पष्ट केले की, “आजपर्यंत मला कोणत्याही पक्षाकडून पक्षांतराची ऑफर आलेली नाही. भविष्यात अशी कोणती ऑफर आली, तर त्यावेळी त्यावर विचार करू.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी उधाण आले आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : मोठी घडामोड..! शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकीय चर्चांना उधाण
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात सुरू असलेल्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केले. “जर ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे किंवा मी पक्ष बदलल्याशिवाय पुणे-नाशिक रेल्वे होणार असेल, तर हा विकासाचा प्रकल्प आहे की लोकप्रतिनिधींवर दबाव टाकून पक्षांतर घडवून आणण्याचा प्रयत्न आहे, असा प्रश्न निर्माण होतो,” असा टोला त्यांनी लगावला.
विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विकासकामांसाठी अपेक्षित निधी मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. “विरोधी पक्षाचे आमदार आणि खासदार यांना विकासासाठी आवश्यक निधी मिळण्यात अडचणी येतात. विकास हा पक्ष पाहून नव्हे, तर जनतेच्या हितासाठी व्हायला हवा,” असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, शरद पवार गटातील खासदार फुटीच्या चर्चांवर त्यांनी ठाम भूमिका मांडली. “पवारसाहेब बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण, हीच आमची भूमिका आहे. पक्षातील खासदार फुटणार असल्याच्या केवळ अफवा आहेत. याबाबत पवार साहेबांनी आधीच स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यामुळे आमचे खासदार पक्ष सोडणार, हा प्रश्नच उद्भवत नाही,” असे सांगत त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.






