Gokul election : ‘गोकुळ’ निवडणुकीत भाजपचा मोठा डाव; 25 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करणार
Gokul election : गोकुळ निवडणुकीसाठी भाजपकडून सर्व २५ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शौमिका महाडिक यांनी दिली. महायुतीच्या जागावाटपानंतर अतिरिक्त अर्ज मागे घेतले जाणार.

Gokul election : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सर्व २५ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेत्या शौमिका महाडिक यांनी दिली. महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे कोणत्या पक्षाला कोणत्या प्रवर्गातून किती जागा मिळणार, हे स्पष्ट झालेले नाही. जागावाटप निश्चित झाल्यानंतर अतिरिक्त उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील, असे महाडिक यांनी सांगितले.
प्रत्येक पक्ष आपल्या ताकदीनुसार जागांची मागणी करत असून सर्व घटक पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोकुळची निवडणूक सभासदांच्या सहमतीने बिनविरोध व्हावी, अशी भूमिका यापूर्वी मांडण्यात आली होती. मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळणे सर्वांच्या हातात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक बिनविरोध न झाल्यास भाजप पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरेल, असेही त्यांनी सांगितले.
‘अदृश्य शक्ती’चा उल्लेख करणाऱ्यांनी ती शक्ती नेमकी कोण, हे स्पष्ट करावे, असा टोलाही महाडिक यांनी लगावला.





