Neha Kakkar: काम आणि नातेसंबंधांपासून ब्रेक घेतल्यानंतर नेहा कक्करची गूढ पोस्ट; घटस्फोटाच्या चर्चांवर दिली प्रतिक्रिया

Neha Kakkar : लोकप्रिय गायिका नेहा कक्कर हिच्याबाबत सध्या सोशल मीडियावर घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. काम आणि नातेसंबंधांपासून काही काळ ब्रेक घेण्याची घोषणा केल्यानंतर नेहाने आता या अफवांवर गूढ पण स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
ब्रेकच्या पोस्टनंतर अफवांना उधाण
सोमवारी नेहा कक्करने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, “मी जबाबदाऱ्या, नाती आणि कामातून काही काळ ब्रेक घेत आहे. कदाचित परत येईन, कदाचित नाही,” असे लिहिले होते. तिने पापाराझी आणि चाहत्यांना फोटो-व्हिडिओ काढू नयेत, तसेच तिच्या खासगी आयुष्याचा आदर करावा, अशी विनंतीही केली होती. मात्र काही मिनिटांतच ही पोस्ट तिने डिलीट केली. यानंतर सोशल मीडियावर नेहा आणि रोहनप्रीत सिंह यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या.
View this post on Instagram
पती आणि कुटुंबाला यात ओढू नका
या चर्चांनंतर काही तासांतच नेहाने इंस्टाग्राम स्टोरीवर नवीन पोस्ट शेअर केली. ती म्हणाली, “मित्रांनो, कृपया माझ्या प्रिय आणि निरागस पतीला आणि माझ्या कुटुंबाला या सगळ्यात ओढू नका. ते मला माहीत असलेले सर्वात चांगले आणि खरे लोक आहेत. आज मी जे काही आहे, ते त्यांच्या पाठिंब्यामुळेच आहे.”
नेहाने पुढे स्पष्ट केले की तिला काही लोकांबद्दल आणि व्यवस्थेबद्दल तक्रार असू शकते, पण त्यात तिच्या पतीचा किंवा कुटुंबाचा काहीही संबंध नाही.
भावनिक पोस्ट केल्याचा पश्चात्ताप
नेहाने मान्य केले की भावनेच्या भरात सोशल मीडियावर पोस्ट करणे ही तिची चूक होती. “लोक लहान गोष्टींचा मोठा अर्थ काढतात. त्यामुळे मी यापुढे माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सोशल मीडियावर बोलणार नाही,” असे तिने लिहिले.
शेवटी नेहाने चाहत्यांना दिलासा देत म्हटले, “ही दुनिया भावुक नेहासाठी खूप कठीण आहे. सॉरी आणि थँक यू. काळजी करू नका, मी लवकरच धमाकेदार कमबॅक करणार आहे!”
नेहा कक्करबद्दल
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांचे 2020 मध्ये लग्न झाले होते. नेहाने ‘आंख मारे’, ‘दिलबर’, ‘हौली हौली’, ‘मोरनी बनके’ यांसारखी अनेक हिट गाणी गायली असून ती विविध संगीत रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणूनही झळकली आहे. तिच्या पोस्टनंतर चाहते आता तिच्या भव्य पुनरागमनाची वाट पाहत आहेत.





