Revenue Court : जमिनीचे दावे १८० दिवसांत निकाली
Revenue Court :

महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणालीच्या वापराची सक्ती
Revenue Court : तहसीलदार, प्रांताधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त विभागीय आयुक्त यांच्याकडील जमीनविषयक दावे लवकर निकाली काढण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणालीचा वापर करण्याचे बंधनकारक केले आहे.
तसा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे सादर केला आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर जमीनविषयक दावा दाखल झाल्यानंतर त्यावर १८० दिवसांत निर्णय देण्याचे बंधन संबधित अधिकाऱ्यांवर असणार आहे.
महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणाली सुरुवातीस प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील १८ जिल्ह्यांत राबविण्यास सुरुवात झाली आहे. आता तिचा टप्प्याटप्प्याने विस्तार केला जात असून, नोव्हेंबरअखेर २६ ते २७ जिल्ह्यांत प्रणाली सुरू करण्याचे नियोजन आहे.
कोल्हापूरसाठी १५ डिसेंबर, सांगलीसाठी १ जानेवारी, तर पुणे आणि अहिल्यानगरसाठी ३० जानेवारीपर्यंत प्रणाली सुरू करण्याची उद्दिष्टे नमूद करण्यात आली आहेत. या डिजिटल व्यवस्थेमुळे प्रकरणांची नोंद, सुनावणीचे नियोजन आणि निकालापर्यंतची प्रगती ऑनलाइन पाहता येणार आहे.
तर अधिकाऱ्यांवर कारवाई Revenue Court :
महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणालीचा वापर सुरू झाल्यानंतर १८० दिवसांत प्रकरणे निकाली काढण्याचे नियोजन आहे. प्रणालीचा वापर बंधनकारक केल्यानंतरही निर्धारित वेळेत कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
कारवाईचे स्वरूप शिस्तभंगाची कारवाई किंवा निलंबन असे असू शकते. मात्र, त्याबाबतचा अंतिम निर्णय सरकारच्या मंजुरीनंतर होईल, असे भूमिअभिलेख विभागाकडून सांगण्यात आले आहे.





