pune: सहा आरोपींना दोन डिसेंबरपर्यंत कोठडी
Pune:

न्यायालय परिसरातील जीवघेणा हल्ला प्रकरण
pune: शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात मंदार किवळे याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर पोलिसांना घटनास्थळी देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसांच्या पुंगळ्या आढळल्या आहेत. गुन्ह्यात वापरलेले कोयते आणि गाडीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी न्यायालयाने सहा आरोपींना दोन डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अक्षय चव्हाण (वय २०), अमोल चव्हाण (वय ४८), ओमकार ऊर्फ बाब्या पवार (वय १९), सत्यम मोरे (वय २५), सूरज मळेकर (वय २२) आणि स्वप्नील गवळी (वय २८) अशी कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना सरकारी वकील मोना राऊत (देवलकर) म्हणाल्या, की अटक केलेल्या आणि फरार आरोपींपैकी काही जण सराईत गुन्हेगार आहेत.
अमोल चव्हाणविरोधात भारती विद्यापीठ पोलिसांत दोन, तर स्वप्नील गवळीविरोधात राजगड पोलिसांत एक गुन्हा दाखल आहे. आरोपी एकाच टोळीतील असल्याने त्यांना फरार साथीदारांची माहिती असण्याची शक्यता आहे. आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून हा हल्ला केला आहे. त्यासाठी कोणी आर्थिक रसद पुरविली, शस्त्रे कोठून मिळविली, याचा तपास करायचा आहे.
गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. न्यायालय परिसरात शस्त्रांसह येऊन प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत आरोपींची मजल जाणे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकार पक्षाने केली. मोरे याच्या वतीने ॲड. राहुन तनपुरे आणि ॲड. राहुल सपकाळ यांनी विरोध केला.
मोरे हा घटनास्थळी हजर नव्हता. त्याच्याविरोधात एकही गुन्हा दाखल नाही. केवळ जवळ राहतो, तसेच फोनवर बोलणे झाल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली आहे.
घटनेवेळी तो धार्मिक कार्यक्रमात होता, असा युक्तिवाद त्यांनी केला. दरम्यान, पोलिसांना गुंगारा देऊन शेतात पळालेल्या प्रथमेश येनपुरेला गुरुवारी अटक करण्यात आली. त्याला उद्या (शुक्रवार) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.





