Rain: जुलैचा धडाका, ऑगस्टमध्ये पावसाची दडी
Rain:

२३ दिवसांत पुण्यात अवघा ७५ मिमी पाऊस, महिन्याच्या सरासरीच्या केवळ ३० टक्के
Rain: जुलै महिन्यातील विक्रमी पावसानंतर ऑगस्टमध्ये पुणे शहरात पावसाने मोठी विश्रांती घेतली आहे. दि. १ ते २३ ऑगस्टदरम्यान शहरात जवळपास ७५ मिमी पावसाची नोंद झाली. जो मासिक सरासरीच्या अवघा ३० टक्के आहे. महिन्यात तब्बल १५ दिवस पावसाने दडी मारली असून, अन्य दिवसातही हलक्या श्रावण सरी पडल्या.
पुणे शहरात ऑगस्ट महिन्यातील आतापर्यंत सर्वाधिक पाऊस २०२० मध्ये तब्बल ८२८ मिमी इतका झाला आहे. इतिहासातील विक्रमी पाऊस आहे. तर ऑगस्ट महिन्यात सरासरी १५६ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत यंदा सरासरीच्या केवळ २५ ते ३० टक्केच पाऊस पडला आहे.
या पूर्वी २०२३ मध्ये सर्वात कमी ६३.९, २०२१ मध्ये ६५.४, तर २०१५ मध्ये ८५ मिमी, म्हणजेच १०० मिमी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली. यंदाही ऑगस्ट महिना कोरडा जात असून, पुढील सात दिवसांत १०० मिमी पार करेल का, याची शक्यता कमी वाटते.
या महिन्यातील तब्बल १३ ते १५ दिवस पावसाने पूर्ण दडी मारली असून, केवळ ढगाळ किंवा अंशतः कोरडे हवामान पाहायला मिळाले. दुसरीकडे दि. १ ते ६ ऑगस्टदरम्यान आणि त्यानंतर अधूनमधून केवळ ८ ते १० दिवस पावसाची हलकी हजेरी लागली.
शहरातील एकूण सरासरी पाऊस (जून ते सप्टेंबर) ६४० ते ६५० मिमी पाऊस पडतो. त्यानुसार २३ ऑगस्ट २०२६ पर्यंत शहरात आतापर्यंत ६६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदा ऑगस्ट कोरडा गेला असला तरी जुलैतील ५०८.९ मिमीच्या ऐतिहासिक पावसामुळे पुण्याचा वर्षभराचा एकूण मान्सूनची सरासरी ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात पूर्ण झाली आहे.
शहरातील महिनानिहाय पाऊस
(जून ते ऑगस्ट २०२६)
जून – ७९ मिमी
जुलै – ५०९ मिमी
ऑगस्ट – ७५ मिमी





