pune : स्वानंद विद्यालयाचे ३० वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

पुणे : धायरी येथील स्वानंद प्राथमिक विद्यालय व बालक मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. सदाशिव पेठेतील टिळक स्मारक मंदिरात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत मनोरे, उपाध्यक्ष विलास नऱ्हे, सचिव अभिषेक मनोरे, मुख्याध्यापिका डॉ. श्रुती मनोरे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रसाद खेकाळे, शिक्षक प्रतिनिधी वंदना कदम, विद्यार्थी प्रतिनिधी समीर खान, राजेश गुळेकर, शैलेश आरते, संजय भोंडवे, अर्जुन होजगे, नागनाथ चौधरी, राजाभाऊ गोवे, रत्नाकर मोकाशे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रास्ताविकात मुख्याध्यापिका डॉ. श्रुती मनोरे यांनी शाळेची वाटचाल आणि मागील वर्षाचा कार्य अहवाल सादर केला. तर अध्यक्षीय मार्गदर्शनात प्रशांत मनोरे यांनी पालकांसमोरील आव्हाने, मोबाईलचे दुष्परिणाम, अभ्यासातील एकाग्रता आणि पालकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी बालक मंदिर ते सातवी यातील इयत्तानिहाय आदर्श विद्यार्थ्यांना पदक प्रदान करत त्यांचे कौतुक करण्यात आले.

यानंतर विद्यार्थ्यांना गीतांवर समूह नृत्य सादर केले. यात खेळ गट, छोटा गट, मोठा गट यांसह इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य आणि अभिनयाला पालकांनी उत्स्फूर्त दाद दिली. यात प्रामुख्याने श्री गणेश वंदना, अभ्यासक्रमातील इंग्रजी गीते, शेतकरी गीत, हिंदी चित्रपटातील गीते यावर विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. तसेच “ऑपरेशन सिंदूर” विषयावरील नृत्य गीतातून आपल्या सैन्याच्या कर्तृत्वाची गौरवगाथा सादर केली.

तसेच कांतारा चित्रपटातील भगवान नृसिंह यांच्यावर आधारित गीत, हनुमान चालिसा विषयावर सादरीकरण यामुळे सभागृहात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. जल आणि पर्यावरण विषयावरही सादरीकरण झाले. राजस्थानातील “कटपुतळी” हा नृत्य प्रकार कार्यक्रमाचे वेगळेपण ठरला.

या सोबतच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील सादरीकरण स्वराज्य निर्मितीची प्रेरणा सांगून गेले. कार्यक्रमाचा समारोप सामुदायिक पसायदानाने झाला. आभार किर्ती मनोरे यांनी मानले.






