pune : महिलांचे लैंगिक शोषण ; आरोपीचे युएईतुन प्रत्यार्पण
pune :

– सीबीआय, सीआयडी आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांची संयुक्त कारवाई
– रेड कॉर्नर नोटिशीनंतर यूएईतून प्रत्यार्पण
pune : लग्नाचे आमिष दाखवून तब्बल १४ महिलांचे लैंगिक व आर्थिक शोषण करणाऱ्या आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर दुबईत पळून गेलेल्या मोहम्मद माझिन मोहम्मद अब्दुल रशीद याला भारतात आणण्यात पोलिसांना यश आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), सीआयडीची इंटरपोल शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून २० नोव्हेंबर रोजी संयुक्त अरब अमिरातीमधून (यूएई) त्याचे प्रत्यार्पण केले.
छत्रपती संभाजीनगर येथील सिटी चौक पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण करून तिच्याकडून १८ लाख रुपये घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
दरम्यान, तपासादरम्यान आरोपीने अशाच प्रकारे आणखी १३ महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक व आर्थिक शोषण केल्याचे उघड झाले. तसेच या महिलांच्या खासगी क्षणांचे व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी परदेशात पळून गेला होता.आरोपीचा शोध घेण्यासाठी सीआयडीच्या इंटरपोल शाखेने छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने सीबीआयशी संपर्क साधला.
त्यानंतर इंटरपोल फ्रान्सच्या माध्यमातून आरोपीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. या नोटिशीच्या आधारे यूएईच्या अधिकाऱ्यांनी आरोपीचे ठिकाण शोधून त्याला अटक केली.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यूएई सरकारने त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यास परवानगी दिली. छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे पथक १८ नोव्हेंबर रोजी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी दुबईला रवाना झाले होते. २० नोव्हेंबर रोजी आरोपीला घेऊन हे पथक कोचीमार्गे नवी मुंबई विमानतळावर दाखल झाले.
यंदा सहा फरार आरोपींना परदेशातून आणले pune :
सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे इंटरपोल समन्वय अधिकारी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय शिंदे आणि सहायक इंटरपोल समन्वय अधिकारी पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई करण्यात आली. इंटरपोल विंगच्या पथकाने २०२६ मध्ये आतापर्यंत परदेशात फरार झालेल्या सहा आरोपींना महाराष्ट्रात परत आणण्यात यश मिळविले आहे.





