Pune Rain : संततधार पावसामुळे जांभूळवाडीत सोसायटीची भिंत पार्किंग शेडवर कोसळली, अन्…
Pune Rain : अग्निशमन दलाच्या तत्परतेने १४ वाहने सुरक्षित बाहेर

Pune Rain : संततधार पावसामुळे रविवारी (५ जुलै) पहाटे सुमारे ३.२४ वाजण्याच्या सुमारास जांभूळवाडी रोडवरील समृद्धी लेक सोसायटीची सीमाभिंत पार्किंग शेडवर कोसळली.
या घटनेत पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने अडकली होती. मात्र, कात्रज व सिंहगड अग्निशमन केंद्राच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करत ७ चारचाकी व ७ दुचाकी वाहने सुरक्षित बाहेर काढली.
घटनेची माहिती मिळताच कात्रज अग्निशमन केंद्राचे प्रभारी उपअग्निशमन अधिकारी संतोष भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. फॅब्रिकेशन तज्ज्ञांच्या मदतीने लोखंडी अँगल ग्राइंडरच्या साहाय्याने पडलेल्या लोखंडी अँगल व पत्रे कापून हटविण्यात आली. त्यानंतर अडकलेली वाहने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली.
या बचावकार्यात कात्रज अग्निशमन केंद्राचे फायरमन मयूर काटे, प्रशांत कुंभार, अक्षय देवकर, चालक शेख तसेच सिंहगड अग्निशमन केंद्राचे फायरमन सुनिल दिवाडकर, राकेश बरे, मदतनीस फायरमन संभाजी आटोळे आणि आदिनाथ पवार यांनी सहभाग घेतला.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, अग्निशमन दलाच्या तात्काळ आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
हेही वाचा:
Pune News: पुणे स्थानिक गुन्हे शाखेचा मोठी कारवाई; दूध भेसळीच्या रॅकेटवर मोठा घाव






