Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ
Pune:

नव्या आराखड्यात उल्लेखच नाही ; महापालिका प्रशासनाकडून अॅमिनिटी स्पेसची चाचपणी
Pune: मुद्रणमहर्षी कै. मामाराव दाते मुद्रणालय असलेल्या घोले रस्ता येथील जागेच्या सुरू असलेल्या पुनर्विकासाच्या नव्या आराखड्यात मुद्रणालयासाठी जागाच ठेवली नसल्याने या मुद्रणालयासाठी आता दुसरीकडे जागा शोधण्याची प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.
यासाठी अॅमिनिटी स्पेसची चाचपणी प्रशासनाने सुरू केली आहे. विशेष म्हणजे महापौरांच्या निर्देशानुसार लावलेले टाळे काढून पुन्हा शाळेतच मुद्रणालय सुरू करण्यात आले आहे, या संदर्भात प्रभात ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर यातील अनेक बाबी उघड झाल्या आहेत.
सिंहगड रस्त्यावरील वडगाव बु. येथील महापालिकेच्या शाळेत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत केलेल्या महर्षी मामाराव दाते मुद्रणालयाला महापौरांनी मंगळवारी (दि. ६) सकाळी टाळे ठोकले. शाळेत मुद्रणालय नको, मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, असा मुद्दा महापौरांनी उपस्थित केला होता,
याविषयी त्यांनी चार वेळा प्रशासनाला पत्र दिले होते. महापौर झाल्यानंतरही त्यांनी यासंदर्भात पत्र दिले होते. अखेर, मंगळवारी सकाळी महापौर याच शाळेत एका कार्यक्रमाला आल्या असता त्यांनी थेट मुद्रणालय बंद करा, असे निर्देश दिले. त्यानंतर महापौरांनी मुद्रणालयाला ठोकले अशी चर्चा सुरू झाली.
यासंदर्भात माहिती घेतली असता, घोले रस्त्यावर ज्या जागेत हे मुद्रणालय होते, तेथे पुनर्विकास सुरू आहे. मात्र, नव्या आराखड्यातून हे मुद्रणालयच गायब झाल्याचे निदर्शनास आहे, त्यातच महापौरांच्या निर्देशानुसार आहे त्या जागेवरील मुद्रणालय बंद करण्यात आल्याने नव्या जागेसाठी प्रशासनाची पळापळ सुरू झाली आहे.
नव्या आराखड्यात तळमजल्यावर पार्किंग आणि वर ग्रंथालय असे नियोजन आहे. त्यामुळे या पार्किंग स्पेसमध्ये मुद्रणालय बसवण्याचा घाटही प्रशासनाकडून घातला जात आहे. परंतु, मुद्रणालयासाठी किमान २० हजार स्क्वे. फूट जागा अपेक्षित असताना एवढी जागा पार्किंग स्पेसमधून वेगळी काढणे शक्य नाही, हे देखील प्रशासनाला लक्षात आल्यानेच आता मुद्रणालयासाठी नवी जागा शोधण्यासाठी पळापळ सुरू झाली आहे. त्यासाठी अॅमेनिटी स्पेसची यादीही मालमत्ता विभागाकडून घेण्यात आली आहे.
मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळेत मुद्रणालय नको, म्हणून ते इतरत्र स्थलांतरीत करावे, असे निर्देश दिले होते. मी यापूर्वीही दोन-तीन वेळा याबाबत पत्र दिले होते. महापौर झाल्यानंतरही एकदा पत्र दिले, मुद्रणालयाचे बांधकाम सुरू असून ते झाल्यावर पुन्हा मूळ जागी स्थलांतरीत होऊ शकते, असे सांगितले होते. मात्र, शाळा सुरू झाल्या आहेत, येथे विद्यार्थी येतात, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. इतक्या दिवसांत कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने शाळेत कार्यक्रमाला गेले असता, याबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांनी स्वत:च मुद्रणालय बंद केले.
– मंजुषा नागपुरे, महापौर, पुणे मनपा
वडगाव बु. येथील महापालिकेच्या शाळेतच आम्ही मुद्रणालय पुन्हा सुरू केले आहे. तसेच, येत्या दोन महिन्यांत घोले रस्त्यावर पुन्हा मुद्रणालयाच्या नव्या जागेत आम्ही स्थलांतरीत होऊ, असे पत्र आम्ही महापौरांना दिले आहे.
– माधव जगताप, उपायुक्त (विशेष), मनपा





