Pune News : अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ बंद पडल्याने विद्यार्थांना मनस्ताप !
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे.

Pune News – माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे. गुरुवारी ( दि.२१) पहिल्या नियमित प्रवेश फेरीला सुरुवात झाली असून प्रवेश अर्जाचा भाग दोन भरणे आणि महाविद्यालयांचे पसंतिक्रम नोंदवण्यास सुरुवात झाली.
प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ सुमारे दोन तासांपेक्षा अधिक काळ बंद पडल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे पहिल्या फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याची नामुष्की ओढावली आहे.
राज्यातील ९ हजार ५९३ कनिष्ठ महाविद्यालयात २१ लाख ९८ हजार ५८६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यात कॅप प्रवेशासाठी १७ लाख ४२ हजार ३५५ जागांचा तर राखीव कोट्यातील ४ लाख ५६ हजार २३१ जागांचा समावेश आहे. प्रवेशासाठी आतापर्यंत ९ लाख ९६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग दोन आणि महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना २२ मे रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु संकेतस्थळ बंद पडल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्जच भरण्यात विघ्न निर्माण झाले.
प्रवेश अर्जाचा भाग दोन भरणे, पसंतिक्रम नोंदवण्यास २३ मे रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिल्या फेरीची निवडयादी २७ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
तर प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना २७ ते २९ मे या कालावधीत महाविद्यालयात जाऊन कागदपत्र पडताळणी करून प्रवेश निश्चित करता येणार आहे. १ जून रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे.
इयत्ता अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर एकदम लोड आल्याने ते दोन तास बंद पडले. त्यानंतर त्यात दुरुस्ती करून ते सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग दोन भरणे, पसंतिक्रम नोंदवण्यास मुदत वाढवून देण्यात आली आहे.
– डॉ.महेश पालकर, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग





